कारच्या अतिरिक्त साधनसामग्रीमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा करून ठेवण्याची सवय काहींना लागते. त्यामागे दर्शनीयता वाढवणे, एखाद्याचे अनुकरण करणे, माहिती न घेता कोणी सांगितले म्हणून स्वतःच त्या साधनसामग्रीचा वापर करणे अशी कारणे आढळून येतात. हॅचबॅक, सेदान, एमयूव्ही वा विशेष करून छोट्या आकाराच्या मोटारींनाही अशी काही साधने लावली जातात की, जी अनावश्यक असतात. कारचे निर्माते काही अशा साधनांची शिफारसही करीत नाहीत. पण तरीही काही भीतीने, काही आकर्षणापायी ही सामग्री कारला जोडतात. उपयुक्ततेची बाबही लक्षात न घेता ते अशी साधने घेत असतात. हॅचबॅक, सेदान वा छोट्या आकाराच्या मोटारींच्या मागील बंपरवर अतिरिक्त गार्ड लावण्याची एक फॅशन दिसून येते. फ्रंट गार्डप्रमाणेच वास्तविक या गार्डचीही आवश्यकता नसते. उलट नवी कार असेल तर अशी साधने कारच्या बॉडीला वेल्ड करून जोडली गेल्याने वॉरंटी वैध होणार नाही, अशा स्वरूपाचा इशाराही कारच्या सर्व्हिस सेंटरकडून वा वितरकाकडून दिला जातो. अर्थात तो चर्चेचा वेगळा विषयही होऊ शकतो.
पण काही साधनांबाबत असा इशारा उपयुक्तही ठरतो. या रेअर गार्डचा काही उपयोग नसतो. मागच्या बाजूला कारबॉडीला तो ज्या पद्धतीने जोडला जातो, त्याची मजबुतीही गार्डम्हणून होऊ शकत नाही. उलट कारचे वजन मात्र विनाकारण वाढते. तो लोखंडाच्या कोयताकृती पट्टीवर वेल्डिंग व नटबोल्टने जोडलेला असतो. काहीवेळा प्रवासात कटकट होऊन बसते. त्याच्यावर काही मागील बाजूने कारने वा अन्य वाहनाने धडक दिली तर कारचे नुकसान होणार नाही, अशी समजूत लोक करून घेतात. वास्तविक या गार्डच्या संलग्नतेची व जोडणीची स्थिती पाहिली तर तो गार्ड किती तकलादू आहे हे लक्षात येईल. त्याने ना संरक्षण होत ना सौंदर्य वाढत. उगाच पैसे खर्च होतात. अशाच एका गार्डला बाहेरगावी गेलेल्या एका मोटारमालकाला वेगळाच अनुभव आला. दगडावर मागीलबाजू लागल्याने गार्डची जोडणी एकाबाजूने वेल्डिंग तुटून बाजूला झाल्याने तो दोर बांधून गॅरेजला गाडी आमली व वेल्डिंग करणे तेथे शक्य नसल्याने दुसरी जोडलेली बाजू बाजूला करावी लागली. कारच्या डिक्कीत ठेवून तो गार्ड शहरापर्यंत आणावा लागला.
पण शहरात वेल्डिंगवाल्याने तो गार्ड पुन्हा वेल्ड करणे शक्य नाही, तो अधिक तकलुपी होईल असे सांगून गार्ड भंगारात काढायला सांगितला. रेअर गार्डची ही अनुभूती घेतल्यानंतर त्या मोटारमालकाला समज आलू, हेच विशेष. मुळात अशा प्रकारच्या साधनांना कारला लावण्यापूर्वी दहादा विचार करावा, त्या साधनाची उपयुक्तता पाहावी, त्याची खरंच गरज आहे का, याचाही शास्त्रीय विचार करावा. तसे करूनही अशा निरुपयोगी साधनाला जर लावले गेले तर पुढे कटकटीला सज्ज राहावे. या मागील गार्डवर लहानमुले खेळताना उबी राहिली तरी तो वाकतो. वेल्डिंग खराब असेल तर तुटते. यासाठी पैसे खर्च करण्यापूर्वी सर्व बाजूने विचार करावा. अन्यथा गार्डचा उपयोग होण्याऐवजी त्रास मात्र पदरी पडतो.