नवी दिल्ली : जर नवीन कार खरेदी करायची असेल, तर प्रत्येकजण शोरूममध्ये जाऊन पहिला प्रश्न विचारेल की, किती दिवसात कारची डिलिव्हरी होईल? बाजारात अशी काही वाहने आहेत, ज्यांची डिलिव्हरी तात्काळ होते, तर काही वाहने अशी आहेत, ज्यांच्या डिलिव्हरीला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्यांच्या कारचा वेटिंग पीरियड वाढला आहे.
तुम्हालाही महिंद्रा कंपनीची वाहने आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला अशा तीन कारबद्दल सांगत आहोत. ज्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आहेत. यामध्ये XUV700, Thar आणि Scorpio N चा समावेश आहे. या तिन्ही मॉडेल्सना ग्राहकांची बंपर मागणी आहे. या मॉडेल्सचा प्रतिक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) 3 महिन्यांवरून 16 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे.
काही महिन्यांपूर्वी Hyundai ने ग्राहकांसाठी 6 एअरबॅग असलेली सर्वात स्वस्त एसयूव्ही Exter लाँच केली होती. या एसयूव्हीचे बुकिंग 1 लाखांच्या पुढे गेले आहे, त्यामुळे या कारचा वेटिंग पीरियड आता 4 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) या एमपीव्हीला ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. या कारचा वेटिंग पीरियड 11 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे, याचा अर्थ जर तुम्ही आज कार बुक केली तर तुम्हाला पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत डिलिव्हरी मिळेल.
दरम्यान, महिंद्रा, ह्युंदाई आणि टोयोटा कडूनच नाही तर इतर ऑटो कंपन्यांकडूनही काही कार अशा आहेत, ज्या तुम्ही आज बुक केल्यास पुढच्या वर्षी डिलिव्हरीसह मिळू शकतात. जास्त मागणी आणि अपूर्ण उत्पादनामुळे वेटिंग पीरियड वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही झिरो वेटिंग पीरियडसह मिळू शकणारी वाहने खरेदी करण्याची योजना देखील करू शकता.