काही वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठ सोडणाऱ्या अमेरिकेच्या जनरल मोटर्सला खरेदीदार मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून जनरल मोटर्स पुण्यातील प्लांट विक्री करण्याच्या प्रयत्नात होती. यासाठी चीनच्या काही कंपन्यांसोबतही बोलणी सुरु होती. अखेर देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेली ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर्सने बाजी मारली आहे.
आज जनरल मोटर्स इंडियाशी संबंधित मालमत्ता, प्रकल्प ताब्यात घेण्यावर 'टर्म शीट'वर करार झाला आहे. दोन्ही कंपन्यांकडून यावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या टर्म शीटमध्ये जमीन आणि इमारती आणि जनरल मोटर्स इंडिया, तळेगाव प्लांट येथे उत्पादनासाठी काही यंत्रसामग्री आणि उपकरणांचे प्रस्तावित संपादन समाविष्ट आहे.
जनरल मोटर्सचा प्रकल्प ताब्यात घेण्यासंबंधी विविध सरकारी प्राधिकरणांकडून आणि संपादनाशी संबंधित सर्व स्टेकहोल्डर्सकडून नियामक मंजूरी मिळविणे, अटींची पूर्तता करणे आदी गोष्टी यात केल्या जाणार आहेत. ह्युंदाईने जनरल मोटर्सचा प्लाँट खरेदी करण्यासाठी किती रक्कम मोजली, याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतू, यामुळे महाराष्ट्रात लाखावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
सध्या ह्युंदाईचा चेन्नईमध्ये प्रकल्प आहे. तिथूनच सर्व गाड्यांचे उत्पादन आणि निर्यात केली जाते. पुण्यात तळेगावमध्ये इलेक्ट्रीक वाहनांसंदर्भात हालचाली होण्याची शक्यता आहे. तसेच मिनी एसयुव्ही सारख्या कार निर्माण करण्यासही मदत मिळणार आहे.