देशात सर्वाधिक खप असलेल्या मारुतीच्या कार एका मागोमाग एक अशा सेफ्टी रेटिंगमध्ये फेल होत असताना दुसरी मोठी कंपनी ह्युंदाई देखील त्याच वाटेवर निघाली आहे. विक्री वाढविण्यासाठी ह्युंदाईने मारुतीसारखाच प्लॅन आखला आणि देशातील दुसरी सर्वाधिक खपाची कंपनी बनली, परंतू लोकांना सुरक्षा देण्याच्या नावाखाली ह्युंदाई देखील अपयशी ठरू लागली आहे.
ह्युंदाईची प्रमिअम सेदान कार ह्युंदाई व्हर्नाला लॅटीन एनकॅपमध्ये झिरो स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या सेदानला जेव्हा पुढे टक्कर देण्यात आली तेव्हा पुढील सीटवर बसलेल्या डमी व्यक्तीला दुखापत झाली. या टेस्टमध्ये अॅडल्ट सेफ्टीमध्ये ह्युंदाई व्हर्नाला 9.23 टक्के आणि चाईल्ड सेफ्टीसाठी 12.68 टक्के रेटिंग देण्यात आले.
लॅटीन एनकॅप टेस्टमध्ये व्हर्नाला बाजुने ठोकर देण्यात आली. यामध्ये गाडीतील लोकांच्या डोक्याला आणि कपाळाला खूपच कमी सुरक्षा मिळते असे समोर आले. तर पोटाला चांगली सुरक्षा मिळते. क्रॅश टेस्टवेळी अचानक बसणाऱ्या झटक्यामुळे प्रवाशाच्या मानेला पुरेशी सुरक्षा मिळत नाही.
भारतीय बाजारात ह्युंदाई व्हर्नाला ड्युअल फ्रँट एअरबॅग, ईबीडी, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक, आयसोफिक्स आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तर टॉप एंड व्हेरिअंटमध्ये साईड आणि कर्टेन एअरबॅग, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, टीपीएमएस, रिअर डिस्क ब्रेक आदी फिचर्स देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे ह्युंदाईची आणखी एक जबरदस्त कार एसयुव्ही टक्सनला लॅटीन एनकॅपने झिरो सेफ्टी रेटिंग दिली आहे.