दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईभारतीय बाजारपेठेत आपल्या उत्पादन लाइनअपला नवीन चालना देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या N-Line रेंजवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. अखेरीस, कंपनीनं यावरून अधिकृतरित्या पडदा उठवला आहे. तसंच यावर्षी भारतीय बाजारात एन-लाइन श्रेणीचं मॉडेल लाँच करणार असल्याची घोषणाही कंपनीनं केली आहे.
ह्युंदाईने आपल्या नवीन एन-लाइन श्रेणीच्या मॉडेल्सचा टीझर नुकताच जारी केला आहे. फक्त 37 सेकंदात, पहिल्या N Line i20 ची झलक या व्हिडीओमध्ये दिसली. मीडिया रिपोर्टनुसार, एन-लाईन रेंजमध्ये भारतीय बाजारपेठेत सादर होणारी कंपनीची ही पहिली कार असेल. जागतिक बाजारपेठेत ही श्रेणी आधीच उपलब्ध आहे आणि या कार त्यांच्या स्पोर्टी लुक, शक्तिशाली इंजिन आणि कामगिरीसाठी ओळखल्या जातात.
कंपनी केवळ एन-लाइन रेंजमध्ये शक्तिशाली इंजिन वापरत नाही, तर मस्कुलर आणि स्पोर्टी एक्सटिरियर देखील या मॉडेल्सचे वैशिष्ट्य आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ही एन-लाईन रेंज भारतातील सर्वांसाठी असेल. यावरू या कार्सची किंमत सर्वांना परवडणारी ठेवली जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.
i20 N Line ची झलकमात्र, कोणते मॉडेल आधी सादर केले जाईल याची कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. पण टीझरमध्ये i20 N Line ची झलक पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारपेठेत उपस्थित असलेल्या या मॉडेलमध्ये कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 120hp ची पॉवर जनरेट करते. या कारमध्ये एक स्पोर्टी एक्झॉस्ट आणि काही मोठे बदल करण्यात आले आहेत, जे त्याला नेहमीच्या मॉडेलपेक्षा वेगळे करतात.
याशिवाय, स्पोर्टी लुकिंग ग्रील, ट्विन एक्झॉस्ट (सायलेन्सर) पाईप्ससह स्पोर्टी फ्रंट/रियर बंपर, मोठे व्हिल्स आणि आकर्षक रंगांचा पर्याय उपलब्ध आहे. बाहेर तसंच आतील बाजूलाही यात मोठे बदल दिसून येतात. कारच्या आतील भागात N बॅजिंग, स्पोर्टी सीट्स, स्पोर्ट फ्रन्ट सिट आणि एक बिस्पोक स्टेअरिंग व्हिल, मेटल पॅडल आणि एक एन-ब्रान्डेड लेदर गिअर नॉबसह येईल.