उष्णतेच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत. तापमान एवढे वाढलेय की इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडण्याची, जळण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढली आहे. हाच धोका वाहनांना देखील आहे. इंजिन गरम होणे, एसी खराब होणे, टायर फुटणे आदी बऱ्याच समस्या येऊ शकतात. यासाठी उन्हाळा सुरु होताच काय काय काळजी घ्यावी, भर रस्त्यात तळपत्या उन्हात गाडी बंद पडली तर काय अवस्था होते याचा विचार करा आणि या गोष्टी लगेचच करा...
जर तुम्ही दुचाकी, कार ड्राईव्ह करत असाल तर आधी इंजिन ऑईल बदला. जर ८-१० महिने होऊन गेले असतील तर याचा विचार नक्की करा. नुकतेच बदलले असेल तर ठीक आहे, परंतु इतर गोष्टींचा विचार करा.
इंजिनला थंड ठेवणारे कुलंट बदला, त्याचा रंग बदलला असेल तर नक्कीच हा उपाय करा. एसीच्या परफॉर्मन्सवर नक्कीच परिणाम होणार आहे. यामुळे एसीचे फिल्टर चेंज करा, गॅस भरा. यामुळे तुमच्या गाडीवर जादाचा लोड येणार नाही.
गाडी पार्क करताना झाडाखाली, शेडखाली पार्क करा. उन्हात उभी केल्याने कारचे पार्ट खराब होऊ शकतात. तसेच स्कूटरचेही तेच असते. सीट तर भाजतेच परंतु उष्णता वाढल्याने इंजिन, बॅटरीसारख्या महत्वाच्या पार्टवर परिणाम होतो.
टायर हा महत्वाच्याहून अधिक महत्वाचा आहे. टायरमध्ये नायट्रोजन भरा. थोडे पैसे जास्त गेले तरी रस्यावरील उष्णता, घासून टायरमधील साधी हवा प्रसरण पावते आणि टायर फुटण्याची शक्यता असते. यामुळे अपघात होऊन जिवावरही बेतू शकते. याचा विचार करा.