देशात इलेक्ट्रीक वाहनांनी बाळसे धरायला सुरुवात केली आहे. अशातच या वाहनांच्या किंमती एवढा जास्त आहेत की त्या पैशांत लोक पुढील ८-१० वर्षे पेट्रोल किंवा डिझेलवरील कार चालवू शकतील. टाटा, एमजीच्या कारच्या किंमती ऑन रोड १४ ते २० लाखांमध्ये आहेत. तर दुचाकीच्या किंमती या लाखाच्या पार आहेत. याचबरोबर या गाड्यांची रेंजही एक विक्रीच्या मार्गातील अडथळा आहेच. परंतू किंमतीचा अडथळा आयआयटी बीएचयुने दूर केला आहे.
आयआयटी बीएचयूने म्हणजेच वाराणसीच्या हिंदू विद्यापीठाच्या आयआयटीने हा शोध लावला आहे. आयआयटीने ऑन बोर्ड चार्जरचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून यामुळे दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रीक वाहनाची किंमत निम्म्याने कमी होणार आहे.
बीएचयूच्या टीमने लॅब स्तरावर या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे. यामध्ये विकास आणि उद्योगाच्या स्तरावर काम सुरु आहे. यामध्ये आयआयटी गुवाहाटी आणि भुवनेश्वरचे तज्ज्ञ देखील काम करत आहेत. याचबरोबर देशातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहने बनविणाऱ्या कंपन्यांनी देखील याची दखल घेतली आहे.
सध्या सर्व कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांमध्ये ऑन बोर्ड चार्जर देतात. परंतू देशात उच्च क्षमतेच्या चार्जिंगची कमतरता असल्याने वाहनांना कंपन्यांच्या आऊटलेटवरच चार्ज करावे लागते. यामुळे वाहने खूप महाग होतात. नव्या तंत्रज्ञानामुळे वाहनांमध्ये ऑन बोर्ड चार्जर असेल, परंतू तो कमी वीज क्षमतेवरही काम करेल. यामुळे या चार्जिंग टेक्नॉलॉजीमुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.