रशिया युक्रेन युद्धानंतर पेट्रोल, डिझेलच नाहीतर त्यावर तोडगा असलेली इलेक्ट्रीक स्कूटर देखील कमालीची महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) च्या किंमती 45,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. क्रिसिलच्या एका रिपोर्टमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
पर्यावरण वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता वाढू लागली आहे. यामुळे ई वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ई-स्कूटर्सकडे लोकांचे आकर्षण वाढल्याने, 2025 पर्यंत त्यांच्या किमती 45,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात. ई-वाहनांसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेद्वारे याची भरपाई केली जाऊ शकते. कमी खर्च, अनेक मॉडेल्सची उपलब्धता आणि घरात चार्जिंगच्या सुलभ पर्यायांमुळे ई-वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत राहील, असे अहवालात म्हटले आहे.
विक्री वाढल्याने सरकारला सबसिडीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागणार आहेत. असे झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारे सबसिडी कमी किंवा बंद करू शकतात. दिल्ली सरकारने यंदा सबसिडी बंद किंवा कमी करण्याचा विचार सुरु केला आहे.
2022-23 मध्ये फेम इंसेंटिवमुळे इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचा खर्च 7,500-9,500 रुपयांपर्यंत कमी येऊ शकतो. यामुळे पुढील वर्षी विक्री वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे 2023 मध्ये सबसिडीवरील खर्चही वाढू शकतो. क्रिसिलने अहवालात म्हटले आहे की ईव्ही विक्रीत वाढ मुख्यत्वे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन अंतर्गत FAME योजना आणि विविध राज्यांनी दिलेल्या सबसिडीमुळे शक्य झाली आहे. यामुळे पारंपारिक अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) वाहन आणि EV च्या खरेदी खर्चामध्ये फरक कमी झाला आहे. FAME च्या पहिल्या टप्प्यात 60-65 टक्क्यांच्या तुलनेत FAME च्या दुसऱ्या टप्प्यात हे प्रोत्साहन 85 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.