कोरोना येण्याआधी चीनच्या दोन बड्या वाहन निर्माता कंपन्या भारतात पाय रोवणार होत्या. तशी तयारीही सुरु झाली होती. परंतू कोरोना आला आणि त्यांचे सारे मनसुबे बारगळले. त्यातच अवाढव्य पसारा असलेली ग्रेट वॉल मोटर्सबाबत एक महत्वाची अपडेट येत आहे.
ग्रेट वॉल मोटर्स भारतात गेल्या दोन- अडीज वर्षांपासून येण्याची वाट पाहत आहे. यासाठी ही कंपनी अमेरिकेच्या जनरल मोटर्सचा प्लांट विकत घेणार होती. परंतू, अद्याप त्या दृष्टीने पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. यामुळे ही कंपनी भारतात येण्याआधीच भारताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीकडे आणखी दोन महिने राहिले आहेत, असे या व्यवहाराशी संबंधीत एका अधिकाऱ्याने सांगितले.
जनरल मोटर्सने २०१७ मध्ये भारतातून एक्झिट घेतली. यानंतर जानेवारी २०२० मध्ये या दोन कंपन्यांमध्ये प्लांट ताब्यात घेण्यावरून करार झाला होता. मात्र, हा व्यवहार काही पुढे सरकला नाही. GWM ने भारतात टप्प्याटप्प्याने सुमारे 1 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा प्लॅन आखला होता. यासाठी जनरल मोटर्सचा तळेगावमधील प्लांट विकत घेणार होती. परंतू या प्रस्तावाला भारत सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही.
या दरम्यान फोर्ड देखील भारत सोडून गेली. आता फोर्डचा गुजरातमधील प्लांट टाटा घेत आहे. नुकताच त्यांच्यात आणि गुजरात सरकारमध्ये करारही झाला आहे. मात्र, अडीज वर्षे झाली तरी जीड्ब्लूएम भारत सरकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.