केंद्र सरकारने मुळची ब्रिटीश ऑटोमोबाईल कंपनी आता चीनच्या कंपनीच्या मालकीची मॉरिस गॅराज मोटर्सविरोधात आर्थिक अफरातफरप्रकरणी चौकशी सुरु केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार कंपनीने चुकीच्या पद्धतीने बिल बनवून, कर चोरी करत सरकारला फसविल्याच्या आरोप करण्यात आला आहे.
एमजी मोटर्सविरोधात केंद्र सरकारच्या कार्पोरेट मंत्रालयाने तपास सुरु केला आहे. एमजीने संदिग्ध कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार केले आहेत. याद्वारे करचोरी केली असून चुकीच्या पद्धीतीने बिले बनवून सरकारला भरकटविण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक अनियमिततेप्रकरणी मंत्रालयाकडून कंपनीला नोटीसही पाठवण्यात आली आहे. यानुसार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. कंपनीचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि लेखापरीक्षक यांची मंत्रालयातील अधिकारी चौकशी करणार आहेत. नोटीस दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
कंपनीनेही नोटीस मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच नोटिसीला उत्तर देण्याची तयारी सुरु केल्याचेही एमजी मोटर्सने म्हटले आहे. सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने २०१९ आणि २०२० या दोन वर्षांमध्ये कंपनीला तोटा दाखविला आहे, तो का दाखविला असे नोटीशीमध्ये विचारण्यात आल्याचे वृत्त आहे. कोणत्याही कंपनीला व्यवसाय सुरु केल्याकेल्याच पहिल्या वर्षात फायदा मिळविणे कठीण असते. भारतात खूप स्पर्धा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून फायद्यात येण्यासाठी अनेक कंपन्यांनी वाट पाहिली आहे. अनेक कंपन्यांनी यासाठी संघर्ष केला आणि नुकसान सहन केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.