नवी दिल्ली - ओला इलेक्ट्रिक (OLA Electric) ने देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पहिली इलेक्ट्रिक कार जगासमोर आणली आहे. त्याचसह नवीन ओला एस १ (OLA S1) स्कूटर लॉन्च करण्याचंही जाहीर केले आहे. ओला एस १ ची सुरुवातीची किंमत ९९ हजार ९९९ इतकी असेल. ही ओलाची दुसरी इलेक्टिक स्कूटर असेल. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
भावेश अग्रवाल यांनी ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलकही दाखवली. ते म्हणाले की, ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार २०२४ मध्ये येईल. त्यात जबरदस्त टेक्नोलॉजी लेंस असेल. साधारण ५०० किमी त्याची रेंज असेल. ओलाची पहिली कार सेडान सेगमेंटमध्ये येऊ शकते. या कारची डिझाईन युनिक असून एकदा चार्ज केल्यावर ५०० किमी धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे. त्याचसोबत ० ते १०० किमी स्पीड अवघ्या ४ सेकंदात पकडेल असंही ओलाने म्हटलं आहे.
ओलानं स्वातंत्र्यता दिवसाचा मुहूर्त साधत या कारची पहिली झलक दाखवली. या कारची वरची बाजू पूर्णत: काचेची असेल. ही कार न्यू इंडियाला प्रेझेंट करेल. स्पोर्टी लूकमध्ये ही कार अत्यंत ढासू दिसते. ओलानं इलेक्ट्रिक बाजारात सर्वात मोठा दावा केला आहे. एका सिंगल चार्जमध्ये ही कार ५०० किमीपर्यंत धावू शकते. सध्या भारतात उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत ही सुविधा खूप जास्त आहे. ओलानं इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी स्वत:चं व्यासपीठ तयार केले आहे.
ओलानं Olaelectric.com वेबसाईच्या माध्यमातून ग्राहकांना स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे. या संकेतस्थळावर स्कूटरची किंमत, चार्ज झाल्यानंतर किती किमी धावेल, पिकअप यासारखी विविध माहिती दिली आहे. लवकरच इलेक्ट्रिक कारबाबत सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध होईल असं सांगण्यात येत आहे. ओलाची ही इलेक्ट्रीक कार भारतात लॉन्च झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेत सध्या असणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांशी थेट मुकाबला करेल. त्यात टाटा मोटर्सची नेक्सॉन, टिगोर ईवी, एमजी जेडएस ईवी, हुंडई कोना इलेक्ट्रिक कारचा समावेश असेल. पिक्चर अभी बाकी है, १५ ऑगस्ट दुपारी २ वाजता भेटू असं ओला कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी ट्विट करून संकेत दिले होते.