सध्या देशात कारच्या किमती गगनाला भिडत आहेत. कार कंपन्या दरवर्षी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवताना दिसत आहेत. काही कंपन्या तर वर्षातून अगदी एकापेक्षाही अधिक वेळा गाड्यांच्या किंमती वाढवताना दिसत आहेत. याच पद्धतीने आता टोयोटानेही आपल्या चार वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने Innova, Fortuner (Standard, Legender आणि GR-S व्हेरिअंट्स), Camry HEV आणि Vellfire HEV च्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. पण यातच, ग्लँजा, अर्बन क्रूझर आणि अर्बन क्रूझर हायरायडरच्या किंमती टोयोटाने पूर्वीप्रमाणेच ठेवल्या आहेत.
Toyota Innova -इनोव्हाच्या सर्वच डिझेल मॉडेलच्या किंमतीत 23,000 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय 2 पेट्रोल व्हेरिअंटच्या किंमतीही 23,000 रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. आता इनोव्हाच्या एन्ट्री लेव्हल GX MT 7 सीटरची किंमत 17.45 लाख रुपये आहे, तर टॉप लाइन XZ AT 7 सीटर इनोव्हा डिझेलची किंमत 26.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Toyota Fortuner -गावापासून अगदी शहरापर्यंत सर्वांनाच प्रिय असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरची किंमतही 77 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. कंपनीने Fortuner चे 4x2 व्हेरिअंटची किंमत 19 हजार रुपयांनी वाढवली आहे. तर 4x4 व्हेरिअंटची किंमत 39 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर Legender आणि GR-S व्हेरिअंट्सची किंमत 77 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Camry आणि Vellfire -कंपनीने टोयोटा कॅमरी हायब्रिड आणि टोयोटा वेलफायर हायब्रिडची किंमतही वाढवली आहे. कॅमरी हायब्रिडची किंमत 90 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यानंतर आता या गाडीची किंमत 45.25 लाख रुपये झाली आहे. तसेच वेलफायर हायब्रिडच्या किंमतीत 1.85 लाख रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर हिची किंमत 94.45 लाख रुपयांवर गेली आहे.