कार किंवा बाईक चालवण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलची गरज लवकरच संपणार आहे. काही महिन्यांत अशी बरीच वाहने येतील, जी डिझेल-पेट्रोलऐवजी इथेनॉलवर चालतील. इथेनॉल हे डिझेल-पेट्रोलपेक्षा सुमारे 40 रुपये प्रतिलिटर स्वस्त पडेल आणि प्रदूषणही कमी होईल. सरकारने कार कंपन्यांना यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सरकारने फ्लेक्स इंधन इंजिन असलेल्या वाहनांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये वाहन कंपन्यांना सहा महिन्यांत फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेली वाहने बाजारात आणण्यास सांगण्यात आले आहे. फ्लेक्स फ्युएल इंजिनने सुसज्ज झाल्यानंतर, वाहने एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर धावू शकतील.
फ्लेक्स फ्युएल इंजिन सुरू केल्याने 100% इथेनॉलवर ही वाहने चालवणे शक्य होणार आहे. या बदलामुळे पर्यावरण तसेच लोकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे. सध्या देशातील अनेक भागात डिझेल आणि पेट्रोलचे दर 100 च्या पुढे आहेत, तर इथेनॉलची किंमत सध्या केवळ 63.45 रुपये प्रतिलिटर आहे. अशा प्रकारे, ते पारंपारिक इंधन डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 40 रुपयांनी स्वस्त आहे. ते पेट्रोलच्या तुलनेत 50 टक्के कमी प्रदूषण पसरवते. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल वापरण्यामुळे मायलेज थोडे कमी मिळणार असले तरी, सरासरी बचत प्रति लिटर 20 रुपयांच्या आसपास आहे.
मंत्र्यांनी असेही सांगितले की काही कंपन्यांनी फ्लेक्स इंधन इंजिनसह वाहने तयार करण्यास सुरुवात केली आहे, तर इतर अनेक कंपन्यांनी लवकरच ते स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. TVS ने 2019 मध्ये भारतात प्रथम फ्लेक्स इंधन इंजिन सादर केले. कंपनीने अपाचे (TVS Apache) बाइकला फ्लेक्स इंधन इंजिन देऊन याची सुरुवात केली. याशिवाय TVS मोटर्स आणि बजाज ऑटोने फ्लेक्स इंधन इंजिन असलेल्या तीनचाकी गाड्याही सादर केल्या आहेत.
लवकरच स्वस्त तेलावर गाड्या धावतीलटोयोटा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांनी फ्लेक्स इंधन इंजिन असलेली वाहने सादर करण्यास आधीच संमती दिली आहे. सरकारच्या ताज्या सल्ल्यानंतर आता सर्व कंपन्यांना या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत अशी अनेक वाहने बाजारात आणली जाऊ शकतात, जी पेट्रोलसोबत इथेनॉलवरही धावू शकतील. सध्या या प्रकारचे इंजिन ब्राझीलमध्ये सर्वाधिक वापरले जात आहे.