मारुती जिप्सी अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं होतं. परंतु आता जिप्सी पूर्णपणे नवीन इलेक्ट्रीक अवतारात सादर करण्यात आली आहे. ही जुनी जिप्सी खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आली आहे. ही भारतीय लष्कर, आयआयटी दिल्ली आणि टॅडपोल प्रोजेक्ट्स नावाच्या स्टार्टअपने रेट्रोफिट केली आहे. गेल्या शुक्रवारी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये (ACC) या मारुती जिप्सी इलेक्ट्रीक प्रदर्शित करण्यात आली. ACC हा द्विवार्षिक कार्यक्रम आहे आणि भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे.
या प्रोजेक्टमध्ये टॅडपोल प्रोजेक्ट या स्टार्टअपनं काम केलं आहे. हे स्टार्टअप आयआयटी-दिल्ली अंतर्गत इनक्युबेट केलं गेलं आहे. या स्टार्टअपच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Tadpole Projects मुख्यत्वे विंटेज कार आणि जिप्सी यांच्याशी संबंधित आहे. हे स्टार्टअप विंटेज कार्सचे रेट्रोफिट देखील करते. ज्याद्वारे जुन्या कार्स मॉडिफाय केल्या जातात आणि नवीन पद्धतीनं तयार केल्या जातात.
कसा आहे लूक?या इलेक्ट्रीक जिस्पीच्या मूळ डिझाइनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. परंतु 'EV' बॅजिंग आणि भारतीय लष्कराचा लोगो एसयूव्हीवर देण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की या मारुती जिप्सीला इलेक्ट्रीक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी 30 किलोवॅट क्षमतेचे किट वापरण्यात आले आहे. याद्वारे सिंगल चार्जमध्ये 120 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळते असा दावाही करण्यात आलाय. मारुती जिप्सी आणि भारतीय लष्कराचं नातं तसं जुनंच आहे. प्रदीर्घ काळापर्यंतही एसयुव्ही लष्कराच्या सेवेत होती. १९८५ मध्ये पहिल्यांदा जिप्सीचा लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता.