ईलेक्ट्रीक वाहने निसर्ग वाचविण्यासाठी जेवढी चांगली तेवढीच वाईटही आहेत. ही वाहने जर जळाली तर एवढा काळा धूर वातावरणात सोडतात की समोरचे काही दिसत नाही. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे एक ईव्ही ट्रक जळताना त्याची आग विझविण्यासाठी लाखो लीटर पाणी लागते. त्या ट्रकची उष्णता एवढी प्रचंड की धूर, उष्णता आणि लागलेले पाणी पाहता ही वाहने कशी काय पर्यावरण वाचवू शकतील, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
टेस्ला कंपनीच्या एका सेमी इलेक्ट्रीक ट्रकला नुकतीच आग लागण्याची घटना घडली होती. ही आग विझविण्यासाठी ५० हजार गॅलन म्हणजेच तब्बल १.९० लाख लीटर पाणी वापरण्यात आले होते. गेल्या महिन्यात झालेल्या या घटनेत एवढे प्रचंड पाणी लागल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड (NTSB) ने दिली आहे.
टेस्लाच्या ट्रकला कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती. एका वळणावर ट्रक चालकाने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावरून खाली उतरला व झाडावर जाऊन आदळला. यानंतर खाली जात अनेक झाडांना त्याने धडक दिली. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात चालक सुखरूप असून त्याला जास्त दुखापत झालेली नाही.
या अपघातानंतर लगेचच ट्रकने आग पकडली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या टँकरसोबत विमानाचीही मदत घेण्यात आली. विमानातून या आगीवर आगनियंत्रक पदार्थ टाकण्यात आले. ही आग विझविण्यासाठी तब्बल १.९ लाख लीटर पाणी लागले.
याहून धक्कादायक बाब म्हणजे अपघात झालेला हायवे १५ तास बंद ठेवण्यात आला होता. आग लागल्याने ट्रकमधील बॅटरींचे तापमान ५४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आग विझविल्यानंतर तो ट्रक ओढून दुसऱ्या जागी नेण्यात आला. पुन्हा आग लागू नये म्हणून पुन्हा निरीक्षणात देखील ठेवण्यात आला होता.