इस्राईल स्थित इलेक्ट्रिकव व्हेइकल स्टार्टअप कंपनी सिटी ट्रान्सफॉर्मर लवकरच बाजारात आपली मिनी इलेक्ट्रिक कार CT-2 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला ही कार युरोपियन बाजारात लॉन्च केली जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी म्हणजेच २०२४ सालापर्यंत ही कार लॉन्च केली जाऊ शकते. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी बॅकअपसह सज्ज असलेल्या या मिनी इलेक्ट्रिक कारच्या आकारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गर्दी आणि ट्राफिकच्या ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये ही मिनी कार उत्तम पर्याय ठरेल असा दावा कंपनीनं केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आसफ फॉर्मोजा यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीत कंपनीनं आतापर्यंत २० मिलियन डॉलर निधी जमा केला आहे. पश्चिम युरोपातील एका कारखान्याची निवड करण्यात आली असून याच ठिकाणी कारचं उत्पादन केलं जाणार आहे. सुरुवातीला कंपनी दरवर्षी १५ हजार कारची निर्मिती करू शकणार आहे. कंपनीनं अद्याप फॅक्ट्री नेमकी कुठे असणार याबाबतची माहिती दिलेली नाही. कंपनी अजूनही निधी जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त उत्पादन करता येईल, असंही फॉर्मोजा म्हणाले.
महत्वाची बाब अशी की युरोपियन बाजारात आणि ब्रिटनमध्ये या कारच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. कार दोन मोडमध्ये ड्राइव्ह करता येते. पहिला परफॉर्मन्स मोड आणि दुसरा सिटी मोड. पहिल्या म्हणजेच परफॉर्मन्स मोडवर ड्राइव्ह करताना कारचा व्हीलबेस वाढतो. या मोडमध्ये कारची टॉप स्पीड ९० किमी प्रतितास इतकी होते. कमीत कमी जागेत कार पार्क करायची झाली की तुम्हाला फक्त सिटी मोडवर स्विच करायचं आहे. असं करताच कारचे व्हील आतल्या बाजूला जातात आणि कारची रुंदी कमी होते.
काय आहे किंमत?अवघ्या १ मीटर जागेत सहज पार्क होणाऱ्या या छोट्या कारची किंमत कोणताही कर न आकारता १६ हजार युरो (जवळपास १४.२० लाख रुपये) इतकी आहे.