इलेक्ट्रीक दुचाकींच्या बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. ओलाच्या भात्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला जेन ३ चे दोन बाण आले आहेत. यात अपडेटेड स्कूटर आणि रोडस्टर मोटरसायकल आहेत. मोटरसायकलची डिलिव्हरी मार्चपासून सुरु होणार आहे, तर ओला एस१ प्रो जेन ३ ची डिलिव्हरी सुरु झाली आहे. त्यापूर्वीच जानेवारीतील विक्रीची मोठी अपडेट आली आहे.
डिसेंबरमध्ये ओलाची विक्री थंडावली होती. यामुळे चेतक पहिल्या क्रमांकावर तर टीव्हीएस दुसऱ्या क्रमांकावर आली होती. आता जानेवारीत ओलाने पुन्हा जोरदार मुसंडी मारली असून चेतक तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. ओलाने ७७ टक्क्यांची वाढ नोंदवत जानेवारीत 24,336 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. हीच विक्री डिसेंबरमध्ये 13,771 यूनिट होती.
बजाजने चेतकची टचस्क्रीन, मोठी सीट साईज आदी गोष्टीं बदलून नवीन चेतक लाँच केली आहे. तरीही चेतकला तिसऱ्या क्रमांकावर जावे लादले आहे. टीव्हीएस आयक्यूबने 23,809 यूनिट विकल्या आहेत. तर चेतकने 21,310 यूनिट विकल्या आहेत. एथरने फसवा डिस्काऊंट जाहीर करूनही खूप मोठे तीर मारू शकलेली नाही. एथरने 12906 युनिट विकल्या आहेत. हिरोची विडा 1615 स्कूटर विकल्या आहेत. बिगॉस 1452 स्कूटर, रिवॉल्ट इंटेलिकॉर्पने 1060 यूनिट विकल्या आहेत.
ग्रीव्स कॉटन मोबिलिटी- 3611 यूनिट विकल्या आहेत. प्युअर एनर्जी- 1650 यूनिट, काइनेटिक ग्रीन- 806 यूनिट अशा ईलेक्ट्रीक दुचाकी विकल्या गेल्या आहेत.
दर महिन्याला ५० हजार दुचाकी विकण्याचे टार्गेट...ओलाने नुकतीच मोटरसायकल बाजारपेठ टार्गेट केली आहे. पेट्रोलच्या मोटरसायकलना टक्कर देईल अशी मोटरसायकलची सिरीज लाँच केली आहे. ७४ हजार रुपयांपासून ही रेंज सुरु होत आहे. यामुळे मोटरसायकच्या बाजारातही धमाका होणार असून दर महिन्याला ५० हजार दुचाकी विकल्या गेल्या तर ओला फायद्यात येईल असे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.