Kia India ने पुन्हा एकदा नव्या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरच्या बुकिंगला सुरूवात केली आहे. Kia EV6 ने गेल्या वर्षी जून महिन्यात भारतात डेब्यू केले. तेव्हापासूनच या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारचे बुकिंग पुन्हा एकदा सुरू केले जात असून, ही कार आता देशातील 44 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्रीमियम इलेक्ट्रिक क्रॉसओवरची किंमत 60.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. या कारचे बुकिंग सुरू करण्याबरोबरच कंपनीने सुरुवातीच्या ग्राहकांसाठी काही ऑफर्सदेखील आणल्या आहेत.
सुरुवातीच्या ग्राहकांसाठी खास ऑफर : Kia EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर बुक करणारे पहिले 200 ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. या ऑफरअंतर्गत त्यांना कार खरेदी केल्यानंतर 30 दिवसांच्या आत 95 टक्के बायबॅक पॉलिसीचा लाभ मिळेल. अर्थात, जर ग्राहकांना कार आवडली नाही तर ते 30 दिवसांच्या आत ती परतही करू शकतात. यानंतर कंपनी त्यांना 95 टक्के पैसे परत करेल. याच बरोबर, 5 वर्षांची मोफत सर्व्हिसिंग आणि 8 वर्षांपर्यंत अथवा 1.60 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटीही मिळेल. ही वॉरंटी कारच्या बॅटरीवर असेल.
कशी आहे नवी Kia EV6? - Kia EV6 इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) बेस्ड आहे. यात, कंपनीने 77.4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये 708 किलोमीटरच्या (ARAI) सर्टिफाइड रेंजसह येतो. ही इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. सिंगल मोटर असलेले RWD व्हर्जन 229 bhp आणि 350 Nm जनरेट करते तर डुअल मोटर सेट-अप असलेले AWD व्हेरिअंट 325 bhp एवढी पॉवर आणि 605 Nm एवढा पीक टॉर्क जनरेट करते.
मोबाइल पेक्षाही फास्ट चार्जिंग - या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरची बॅटरी अल्ट्रा-फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जी 4.5 मिनिटांतच बॅटरी एवढी चार्ज करते की, ही कार 100 किलोमीटरपर्यंत रेंज जेऊ शकेल. कंपनीचा दावा आहे की 350 KW DC फास्ट चार्जरने ही बॅटरी केवळ 18 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते. तसेच 50 KW DC चार्जरसह 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे 73 मिनिटे एवढा वेळ लागतो. मोबाईलचा विचार करता, सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असलेले एखादे मॉडेल सोडल्यास, बहुतेक स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी 18 मिनिटांपेक्षाही अधिक वेळ लागतो.