नवी दिल्ली : किआ इंडिया (Kia India) भारतीय ऑटो मार्केटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. भारताबरोबरच परदेशातही कंपनीच्या वाहनांना मोठी मागणी आहे. अलीकडे, किआ इंडियाने परदेशी बाजारपेठेत कार निर्यातीच्या बाबतीत नवीन स्थान मिळवले आहे. कंपनीने दीड लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. किआ इंडिया ही भारतातील युटिलिटी व्हीकल (UV) ची सर्वात मोठी निर्यातदार आहे. किआ इंडियाने आतापर्यंत 95 देशांमध्ये 150,395 युनिट्स पाठवले आहेत. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कंपनीला 3 वर्षे लागली.
माहितीनुसार, किया इंडिया भारतातून 95 वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या तीन वाहने निर्यात करते. यात Kia Seltos, Sonet आणि Carens सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनी या कारची निर्यात मिडल-इस्ट, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि आशिया पॅसिफिकमध्ये करते. दरम्यान, कंपनीने सप्टेंबर 2019 मध्ये वाहनांची निर्यात सुरू केली होती.
भारतातून इतर देशांमध्ये निर्यात होणारी कंपनीची पहिली कार Kia Seltos SUV होती. या कारने कंपनीने भारतात आपला व्यवसाय सुरू केला. भारतात कंपनी एकूण 5 मॉडेल्सची विक्री करते. यामध्ये Kia Sonet, Kia Seltos, Kia Carnival, Kia Carens आणि Kia EV6 मॉडेल्सची विक्री केली जाते. Kia Sonet हे कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल आहे, ज्याची किंमत फक्त 7.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीने आतापर्यंतची सर्वाधिक मासिक निर्यात नोंदवली आणि एकूण 8,174 युनिट्सची निर्यात केली. Kia Seltos ही कंपनीची सर्वाधिक निर्यात केलेली कार आहे आणि एकूण निर्यातीमध्ये 72 टक्के योगदान दिले आहे. यानंतर Kia Sonet आणि नंतर Kia Carens हे दोन क्रमांकावर राहिले आहेत. कंपनीने 2022 च्या पहिल्या आठ महिन्यांत 54,153 युनिट्स पाठवले, ज्यामुळे ते वर्षातील सर्वात मोठे युटिलिटी व्हीकल (UV) निर्यातदार बनले.