मुंबई: सेल्टोस, सॉनेट, कार्निवल आणि कॅरेन्स अशा एकापेक्षा एक कार लॉन्च करून भारतीय बाजारात पाय रोवणारी किया मोटर्स आता मोठा धमाका करणार आहे. कंपनीनं नुकतंच EV6 नाव भारतासाठी ट्रेडमार्क करून घेतलं. त्यामुळे किया इलेक्ट्रिक कार बाजारात लवकरच प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय कंपनीनं EV6 लाईट, EV6 एअर, EV6 वॉटर आणि EV6 अर्थ नावांच्या ट्रेडमार्कसाठीदेखील अर्ज केले आहेत. त्यामुळे किया इलेक्ट्रिक बाजाराबद्दल अतिशय गंभीर असल्याचं स्पष्ट होत आहे.
भारतीय बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन कंपनीनं फास्ट चार्जिंगवर विशेष लक्ष दिलं आहे. अवघ्या १८ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होणारी बॅटरी कंपनी देणार आहे. किया दोन बॅटऱ्यांवर काम करत आहे. पैकी एक बॅटरी एका चार्जमध्ये ५२८ किलोमीटरची रेंज देते. तर दुसरी बॅटरी एका चार्जिंगमध्ये ४०० किलोमीटर अंतर कापते. कियाच्या EV6 मध्ये अशा दमदार क्षमतेच्या बॅटरीज असतील.
डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास किया EV6 मध्ये LED DRLs Strips, LED हेडललँप्स, सिंगल स्लेट ग्लॉस ब्लॅक ग्रील, ग्लॉस ब्लॅक फिनिश असलेलं एयरडॅम, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, ब्लॅक्ड-आऊट पिलर्स आणि ORVMs, टेललाइट्स आणि ड्युअल टोन बंपर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एसीसाठी टच कंट्रोल, ट्रान्समिशनसाठी रोटरी डायल आणि सेंटर कन्सोलवर स्टार्ट-स्टॉप बटण देण्यात आलं आहे.