नवी दिल्ली-
किया कंपनीच्या (KIA) कारमध्ये एअरबॅग संबंधित त्रुटी आढळून आल्यानं कंपनीनं आपल्या ४,१०,००० हून अधिक कार बाजारातून परत मागवल्या आहेत. या कार थेट अमेरिकेत दुरुस्तीसाठी जाणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करुन कंपनीनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
किया कंपनीनं ज्या कार परत मागवल्या आहेत त्यात २०१७ आणि २०१८ मॉडलच्या Forte च्या लहान कारचा समावेश आहे. तसंच २०१७ ते २०१९ पर्यंत सेडोना मिनीवॅन आणि सोल छोटी एसयूव्ही कारचाही समावेश यात आहे. यात इलेक्ट्रीक सोल देखील समाविष्ट आहेत.
कोरियन ऑटोमेकर किया कंपनीच्या म्हणण्यानुसार कारच्या एअर बॅग्स कंट्रोल कॉम्प्युटर कवर मेमरी चिपशी संपर्क होऊ शकतो आणि इलेक्ट्रिक सर्किटला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे एअर बॅक्स फुलण्यास मज्जाव निर्माण होतो. त्यामुळे या कारच्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याची गरज आहे.
कारच्या मालकांना २१ मार्चपासून ई-मेलच्या माध्यमातून याबाबतची सूचना दिली जाणार आहे. अमेरिकी सुरक्षा नियामकांद्वारे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये कियानं नमूद केलं आहे की, ही समस्या कोरियामध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात समोर आली आहे. कंपनीकडे सध्या १३ ग्राहक तक्रारी आणि ९४७ वॉरंटी दावे आलेले आहेत. पण कोणतीही दुर्घटना किंवा दुखापत झाल्याची तक्रार समोर आलेली नाही.
Kia Carens बाबत अपडेटकिया कंपनीनं नुकतीच भारतीय बाजारात दाखल केलेली किया कॅरेन्स कारची बुकिंग १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अल्पावधीतच भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या किआ मोटर्सने Kia Carens ही ७ सीटर कार लॉंच केली असून, भारतातून ग्लोबल डेब्यू केले आहे.
Kia Motors मोटर्सने दावा केला आहे की, Carens थ्री-रो सेगमेंट मध्ये सर्वात लांब व्हीलबेस सोबत येणार असून, यात इलेक्ट्रिक पॉवर फोल्डिंग सीट्स आणि एम्बिअँट मूड लायटिंग सारखे फर्स्ट इन क्लास सेगमेंट फीचर्स असतील. Carens पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन ऑप्शन सोबत येईल. यासोबत यात थ्री ड्रायविंग मोड सुद्धा असेल.