कमी काळात भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये तुफानी सेल करणारी कंपनी किया मोटर्सने आता सीएनजीच्या कार आणण्याची तयारी केली आहे. यामुळे मारुतीला मोठा फटका बसणार आहे. कियाच्या कार गेल्या तीन-चार वर्षांत खूप पसंत केल्या गेल्या आहेत. आता या कार सीएनजीमध्ये आल्यास मारुती, टाटाला चांगलीच स्पर्धा मिळणार आहे.
टाटासह ह्युंदाई सारख्या कंपन्या त्यांच्याकडील एसयुव्ही सीएनजी व्हेरिअंटमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहेत. यामुळे किया मोटर्सने देखील किया सोनेट ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही सीएनजीमध्ये आणण्याची तयारी सुरु केली आहे. ही कार मारुतीच्या ब्रेझा आणि टाटाच्या येत्या नेक्सॉन सीएनजीला टक्कर देणार आहे.
कियाच्या सोनेट सीएनजीची भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग सुरु झाली आहे. येत्या काळात किया सेल्टॉस आणि कॅरेन्सलाही सीएनजीमध्ये आणण्याची शक्यता आहे. किया सोनेटमध्ये १.० लीटर ३ सिलिंडर टर्बो चार्ज इंजिन आहे. सीएनजी व्हेरिअंटमध्ये २४ ते ३० किमी प्रति किलोचे मायलेज मिळू शकते. लुक आणि फिचर्स सोनेटच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटसारखेच असणार आहेत. फक्त सीएनजी कार पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा लाखभर रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे.
येत्या जुलैमध्ये किया सेल्टॉसचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. ही कियाची आल्या आल्या जबरदस्त यश देणारी कार आहे. किया पुढील पाच वर्षांत ईलेक्ट्रीक कार देखील लाँच करणार आहे. सध्याची कियाची इलेक्ट्रीक कार ही खूपच महागडी आहे.