ओलाच्या ग्राहकांना स्कूटर घेतल्यानंतर पस्तावण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीय. ओलाच्या स्कूटर एवढ्या समस्या देणाऱ्या आहेत की जेवढ्या स्कूटर बंगळुरूच्या गिगाफॅक्टरीत नाहीत तेवढ्या त्या सर्व्हिस सेंटरवर धुळ खात पडून आहेत. लोकांनी याचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल केले आहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या सर्व्हिस सेंटर परिसरातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता प्रसिद्ध कॉमेडिअन कुणाल कामराने या लाखो पिडीत ओला स्कूटर ग्राहकांचा आवाज उठविला आहे. यावरून ट्विटरवर कामरा विरुद्ध भाविश अग्रवाल असा सामना रंगला आहे.
महिनाभरापूर्वी ओला इलेक्ट्रीकने आयपीओ आणला होता. लोकांचे पैसे दुप्पट केले खरे परंतू गेल्या शुक्रवारी तो १०० रुपयांच्या खाली आला आहे. लोक ओलाच्या स्कूटरच्या तक्रारींवर तक्रारी करत आहेत. दीड-पावणे दोन लाख मोजून या स्कूटर एकतर सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा लोकांच्या घरी भंगारात पडल्यात जमा आहेत. सर्व्हिस सेंटरमधील अवस्था तर अत्यंत भीषण आहे. कर्मचाऱ्यांवर प्रचंड लोड आहे. सर्व्हिस मिळत नसल्याने ग्राहक संतापलेले आहेत, त्यांना तोंड देता देता या कर्मचाऱ्यांना नाकी नऊ येत आहेत. एकाने तर ओलाचे सर्व्हिस सेंटरच जाळले आहे.
अशा तापलेल्या वातावरणात कुणाल कामराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत ओलाच्या ग्राहकांच्या मनातील मुद्दा उचलल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. लोक आता आपली भडास ओला कंपनीवर काढू लागले आहेत. ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ओला गिगाफॅक्टरीचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने ओलाच्या सर्व्हिस सेंटर बाहेरचा धूळ खात पडलेल्या नादुरुस्त स्कूटरचा फोटो पोस्ट करून हा आवाज भारतीय ग्राहकांचा आहे का? त्यांना हेच मिळायला हवे का? असा सवाल करत ओलाच्या ज्या ग्राहकांना काही समस्या आहे त्यांनी खाली प्रत्येकाला टॅग करून त्यांची पीडा मांडावी, असे म्हटले.
यावरून खवळलेल्या भाविश अग्रवाल यांनी कुणाल कामरालाच सुनावण्यास सुरुवात केली. तुम्हाला खूप काळजी आहे, तर या आणि आम्हाला मदत करा! तुमच्या अयशस्वी कारकिर्दीच्या या पेड ट्विटपेक्षा जास्त पैसे देईन. नसेल तर गप्प बसा आणि आम्हाला ग्राहकांच्या वास्तविक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करु द्या. आम्ही सेवेचे जाळे झपाट्याने वाढवत आहोत, या स्कूटरच्या रांगा लवकरच संपविण्यात येतील, असे अग्रवालनी म्हटले. यानंतर हे दोघेही काही एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांच्यात ट्व्टिटर वॉर सुरुच राहिले. यावर हजारो पिडीत ओला स्कूटर ग्राहकांनी देखील आपल्या समस्या मांडत ओला स्कूटर हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आरोप केले आहेत.