भारताता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतच जात आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्या देखील वेगानं आपला विस्तार करत आहेत. देश-परदेशातील कंपन्यांसोबतच अनेक स्टार्टअप उद्योग देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायात येत आहेत. यातच kWh Bikes कंपनीनं इलेक्ट्रिक मार्केटमध्ये दमदार एन्ट्री घेत Ola, Hero आणि Okinawa सारख्या कंपन्यांना टेन्शनमध्ये टाकलं आहे. kWh कंपनीनं केलेल्या घोषणेनुसार कंपनी २०२३ पर्यंत आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीला सुरुवात करेल आणि कंपनीला प्री-ऑर्डर देखील मिळाल्या आहेत.
बंगळुरूच्या या स्टार्टअप कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांना तब्बल ७८ हजार इलेक्ट्रिक स्कूटरसाठीचं प्री-बुकिंग मिळालं आहे. देशातील ७५ विविध डिलर्स या स्कूटरची विक्री करण्यासाठी तयार आहेत. कंपनीनं या स्कूटरसाठीची प्री-बुकिंग फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुरू केली होती. कंपनीच्या माहितीनुसार त्यांना आतापर्यंत १ हजार कोटींची ऑर्डर मिळाली आहे आणि ही स्कूटर पुढील वर्षी लॉन्च होईल. सध्या कंपनी विविध डिलर्सची साखळी तयार करण्यां काम करत आहे.
kWh बाइकनं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधून अनेक डिलर्स कंपनीसोबत जोडले गेले आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर वैयक्तिक ग्राहकांपासून ते व्यावसायिक पातळीवरील वापरासाठी सुयोग्य ठरणार असल्याचा दावा देखील कंपनीनं केला आहे.
आतापर्यंत ज्या प्री-ऑर्डर बुकिंग मिळाल्या आहेत त्या कोणत्याही मार्केटिंगविना मिळाल्या आहेत, असं कंपनीचे सीईओ आणि संस्थापक सिद्धार्थ यांनी सांगितलं. तसंच या स्कूटरमध्ये परदेशातील ग्राहकांनीही स्वारस्य दाखवलं आहे. पण सध्या कंपनीचं भारतीय बाजारपेठेवरच लक्ष आहे.
kWh कंपनीच्या स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात येत आहे आणि नॉर्मल सॉकेटमधून चार तासात बॅटरी संपूर्ण चार्ज होऊ शकते. संपूर्ण चार्ज झाल्यानंतर स्कूटर १२-१५० किमी रेंज सहज देऊ शकते. या स्कूटरची टॉप स्पीड ७५ किमी प्रतितास इतकी आहे. भारतीय परिस्थितीनुसार स्कूटरच्या निर्मितीत विशेष काळजी घेण्यात येत असल्याचंही संस्थापक सिद्धार्थ जंघू यांनी सांगितलं.
हीरो, ओकिनावा आणि ओला सारख्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. ओलानं एस वन आणि एस वन प्रो या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. तर हीरो कंपनी देखील बऱ्याच काळापासून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात आहे. या कंपनीचं टू-व्हीलर मार्केट देखील खूप मोठं आहे. kWh कंपनीच्या स्कूटरला मिळालेलं बुकिंग पाहता प्रस्थापित ब्रँडला देखील धक्का बसू शकतो असं चित्र आहे.