लोकप्रिय टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे. एका नवीन मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनी बर्ड ग्रुपच्या सहकार्याने ही कंपनी पुनरागमन करेल. कंपनी भारतात 2023 मध्ये 200 आणि 350 cc मध्ये हाय पॉवर स्कूटर G, V आणि X मॉडेल्सची सीरिज सादर करेल. याशिवाय कंपनीने 2024 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची योजनादेखील आखली आहे.
भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी समूह पुढील 5 वर्षांत बर्ड ग्रुपसोबत 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करेल, अशी माहिती ET Auto शी बोलताना लँब्रेटा ब्रँडचे मालक आणि इनोसेंटी एसएचे बोर्ड सदस्य वॉल्टर शॅफेरहान यांनी दिली.
नवीन स्कूटर्स हाय-एंड मॉडेल म्हणून आणल्या जातील. या संयुक्त उपक्रमात लॅम्ब्रेटाचा 51 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित 49 टक्के हिस्सा बर्ड ग्रुपने विकत घेतला आहे. कंपनी 2023 च्या सुरुवातीला CBU आणि SKD मॉडेल लाँच करेल. याशिवाय, कंपनी 2024 च्या पहिल्या तिमाहीपासून भारतात उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे.
इलेक्ट्रीक स्कूटरही येणार
इलेक्ट्रीक लॅम्ब्रेटा स्कूटर 2023 मध्ये मिलान मोटरसायकल शोमध्ये सादर केली जाईल आणि तेच मॉडेल भारतात स्थानिक पातळीवर तयार केले जाऊ शकते. लॅम्ब्रेटा सध्या जवळपास ७० देशांमध्ये उपस्थित आहे आणि स्कूटर्स युरोप, आशियातील काही ठिकाणी तयार केल्या जातात. दरम्यान, कंपनीची ही भारतातील सर्वात मोठी फॅक्ट्री असण्याची शक्यता असून कंपनी याचा वापर निर्यातीसाठी करणार आहे.
या फॅक्ट्रीची क्षमता सुमारे 1 लाख युनिट असेल आणि 5000 लोकांना यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कंपनी मानेसरमध्ये एक नवीन कारखाना उभारणार आहे आणि स्कूटरच्या स्थानिकीकरणाचे काम 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये सुरू होईल.