नवी दिल्ली : वाहन उत्पादक कंपनी होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) देशांतर्गत बाजारात आपल्या दोन सेडान कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपल्या होंडा सिटी (Honda City) आणि अमेझच्या (Amaze) किमती 1 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. तसेच, कारच्या किमतीत वाढ करण्याचे कारण म्हणजे वाढलेल्या खर्चाच्या दबावाचा प्रभाव असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
होंडा कार्स इंडियाने सांगितले की, आमचा प्रयत्न हा वाढ अंशतः भरून काढण्याचा आहे, पण थोडा प्रभाव पाडणे अत्यावश्यक झाले आहे. आम्ही जूनपासून सिटी आणि अमेझच्या किमती 1 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहोत, ज्या विविध व्हेरिएंटमध्ये वेगवेगळ्या असतील.
सध्या अमेझची किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 9.6 लाख रुपयांपर्यंत जाते, तर स्ट्राँग हायब्रिड ट्रिम्ससह होंडा सिटीची एक्स-शोरूम किंमत 11.55 लाख ते 20.39 लाख रुपये विकली जाते. दरम्यान, किमतीत वाढ करण्याचे काम केवळ होंडा करत नाही, तर देशातील प्रमुख कार उत्पादकांनी देशात लागू केलेल्या नवीन BS6 उत्सर्जन नियमांमुळे आपल्या मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत.
होंडा सिटी स्ट्राँग हायब्रीडचे दर वाढणार नाहीत?कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाढलेल्या किमतींचा होंडा सिटीच्या स्ट्राँग हायब्रीड ट्रिम्सवर कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, होंडा सिटी हायब्रिड ही एक सेल्फ-चार्जिंग हायब्रिड कार आहे आणि यात 1.5-लिटर 4-सिलिंडर अॅटकिन्सन सायकल इंजिन आहे. हे इंजिन हायब्रिड मोडमध्ये 124 एचपी पॉवर प्रदान करते. यात होंडाचे ई-सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, City e:HEV मध्ये 26.5 kmpl ची इंधन कार्यक्षमता मिळू शकते.