पेट्रोलियम संरक्षण व संशोधन विश्लेषण संस्था (पीसीआरए) या संस्थेचा इंधनबचतीचा अभ्याक्रम केला तरच ड्रायव्हिंग लायसेन्स द्यायचे असा कायदा येण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव पाठवण्यात आला असून आता यामुळे चांगलीच खळबळ उडणार आहे. मुळात इंधनबचत करा हे सांगण्याची गरजच भासावी का, असा प्रश्न लोकांना पडायला हवा तो पडत नाही, हेच चुकीचे आहे, असे म्हणायची आवश्यकता आलेली आहे. इलेक्ट्रिक कार आणल्या जाव्यात व पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या कार बंद कराव्यात अशा धोरणाच्या विचारापर्यंत सरकारला यावे लागले आहे, हेच या मागचे आणखी एक गमक म्हणावे लागेल. प्रदूषण, इंधन आयातीवर होणारा मोठा खर्च हे टाळण्यासाठी जसे विद्युत कारचा पर्याय काढण्याचा सरकारचा विचार आहे तसाच इंधन बचत करण्याचीही काळाची गरज आहे.
इंधन बचतीसाठी असणारे उपाय सर्वसाधारण कारच्या प्रत्येक माहितीपुस्तिकेत देण्यात येतातही. त्यामध्ये कार चालवताना तुमची कारचे गीयर टाकण्याची पद्धत महत्त्वाची असते. विनाकारण एक्सलरेशन देऊ नये, कार ४० ते ६० किलोमीटर प्रति तास या वेगाने टॉप गीयरमध्ये असताना चालवणे, विनाकारण गीयर बदलू नयेत व वेग वाढवण्यासाठी झटका देऊन एक्सलरेशन देऊ नये, सिग्नल वा कार थांबवलेली असताना कारचे इंजिन बंद करावे, उतारावर असताना विनाकारण एक्सलरेशन देऊ नये, चढावावर कार नेत असताना योग्य त्या गीयरचा वापर करावा आदी विविध उपाय इंधन बचतीसाठी आहेत. मात्र त्यासाठी अशा प्रकारचा कोर्स करायला लावणे व तरच लायसेन्स मिळेल अशी अट घालण्याची वेळ येणे हे भारतीयांसाठी नक्कीच दुर्दैव आहे.
इंधन वाचवण्यासाठी या कार चालवण्याच्या पद्धतीबरोबरच चांगले खड्डेविरहीत रस्ते, सार्वजनिक वाहनांची उपलब्धता, चांगली सार्वजनिक वाहने व तशी त्याची फ्रिक्वेन्सी, हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. या निमित्ताने इंधनाच्या बचतीला चांगले प्रोत्साहन मिळू शकेल. या दिवाळीपर्यंत दुचाकीच्या सुमारे एक कोटीपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे सिआम या वाहन उद्योजकांच्या संघटनेने दिलेल्या
आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे, यामुळे किती इंधन आता अधिक लागणार आहे, ही वाहनांची संख्याही किती वाढत जाईल, यावरही काही उपाय सरकारप्रमाणे लोकांनीही करायला हवा, हे मात्र या निमित्ताने स्पष्ट होते. इंधन बजतीचा कोर्स केल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसेन्स मिळणार नाही, हे करायची वेळ येणे ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागले हे मात्र नक्की!