आजकाल अनेक कारमध्ये एलईडी लाईट दिल्या जात आहेत. पूर्वी हॅलोजन लाईट असायच्या. यामुळे काहीशी पिवळी लाईट रस्त्यावर फेकली जायची. आता पांढरी धम्मक लाईट रस्त्यावर पडते. पर्यायाने ती समोरच्याच्या डोळ्यात पडते आणि त्यालाही दिसेनासे होते. धोका तर आलाच असा नाही तर तसा... दोन्ही प्रकारच्या लाईटचे काही फायदे तोटे आहेत.
एलईडी लाईट जास्त प्रकाश फेकतात. यामुळे रात्रीच्यावेळी ड्रायव्हिंग करणे सोपे जाते. तसेच एलईडी लाईट कमी वीज खर्ची घालतात. यामुळे बॅटरी, वायरिंग आणि हिटवर मोठा प्रभाव पडतो. एलईडी लाईटचे आयुष्यही जास्त असते. यामुळे ती सारखी बदलावी लागत नाही.
हे फायदे जरी असले तरी तोटेही जाणून घ्या. एलईडीची किंमत जास्त असते. या काही हजारांत मिळतात तर हॅलोजन बल्ब शंभर दोनशेच्या आत मिळतात. एलईडी लाईट समोरच्याच्या डोळ्यात पडली तर त्याला काही काळासाठी आंधळे करू शकते. यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच धुके असेल तर देखील एलईडीमुळे व्हिजिबिलीटी मिळत नाही.
हॅलोजन लाईटचा पहिला फायदा म्हणजे बल्ब खूपच स्वस्त असतात. तसेच आरामात उपलब्ध होतात. काही बाईक आणि कारचे बल्ब एकसारखेच असतात. पिवळी पांढरी लाईट पडत असल्याने व्हिजिबिलीटी चांगली असते. पावसाळा असो की हिवाळा तुम्हाला रस्त्यावरचे चांगले दिसते. तोट्याचे बोलायचे झाले तर हॅलोजन लाईट कमी प्रकाश देतात. जास्त पावर घेतात व त्यांचे आयुष्यही कमी असते.