मारुतीने काही वर्षांपूर्वी डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादनाचा वाढलेला खर्च, कर आणि प्रदुषण हे मुद्दे लक्षात घेऊन मारुतीने पेट्रोल, सीएनजी कारवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानंतर फोक्सवॅगन ग्रुपने देखील असाच निर्णय घेत डिझेल इंजिनच्या गाड्या बंद केल्या होत्या. एकंदरीतच प्रदुषणामुळे डिझेल इंजिनबाबत भारतात अनिश्चितता असताना टाटाही डिझेल इंजिन बंद करणार का, असा सवाल उपस्थित होत होता. यावर कंपनीने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
भारतात डिझेल हा नेहमीच लोकप्रिय इंधन पर्याय राहिला आहे. परंतू कठोर कार्बन उत्सर्जन नियमांमुळे कंपन्यांना हे इंजिन सुरु ठेवणे कठीण जाऊ लागले आहे. टाटाचे प्रमुख अधिकारी विवेक श्रीवास्तव यांनी टाटा डिझेल इंजिन सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. परंतू, भविष्यातील जोखीमा पाहून टाटा सफारी, हॅरिअरसारख्या कारमध्ये पेट्रोल इंजिनही देणार असल्याचे म्हटले आहे.
Tata Altroz Racer च्या लाँचिंगवेळी श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. अल्ट्रॉझच्या एकूण विक्रीपैकी ८ टक्के विक्री ही डिझेल इंजिनची आहे. तर नेक्सॉनच्या एकूण विक्रीपैकी १६ टक्के विक्री डिझेल इंजिनची आहे. डिझेल इंजिनची मागणी लगेचच कमी होणारी नाही. टाटा हॅरिअर आणि सफारीच्या पेट्रोल आणि ईव्ही व्हेरिअंटवरही काम करत असल्याचे ते म्हणाले.
भविष्यात येणाऱ्या टाटा कर्व्हमध्येही ईलेक्ट्रीक आणि डिझेल इंजिन असेल, असे त्यांनी सांगितले. यामुळे भविष्यात डिझेल इंजिन बंद करण्याचा टाटाचा प्लॅन नाहीय हे स्पष्ट होत आहे. डिझेल इंजिन हे जास्त मायलेजसाठी आणि अधिकच्या टॉर्कसाठी ओळखले जाते. यामुळे याचे प्रेमी हे वेगळेच आहेत. ज्यांचे जास्तीचे रनिंग आहे, ते ग्राहक डिझेल इंजिनच्या कार घेतात.