नवी दिल्ली: आताच्या घडीला Mahindra कंपनीचा भारतीय बाजारात बोलबाला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने वाहन विक्रीत मोठी वाढ नोंदवली. महिंद्रा कंपनी आता इलेक्ट्रिक कारवर काम करत असून, लवकरच भारतीय बाजारात लॉंच केली जाईल, असे सांगितले जात आहे. महिंद्रा कंपनीचे प्रमुख आणि दिग्गज उद्योगपतींपैकी एक असलेले आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. यातच आनंद महिंद्रा यांनी एका कारची माहिती देताना त्याची किंमत केवळ १२ हजार ४२१ असल्याचे म्हटले आहे.
आनंद महिंद्रा नेहमीच ट्विटरवर सक्रीय असतात. अनेकांचे आवडलेले विचार, गोष्टी, वस्तू ते शेअर करत असतात. अनेकांचे कौतुक करत असतात. याशिवाय आपले विचार थेट आणि स्पष्टपणे मांडत असतात. देशातील युवापिढीशीही आनंद महिंद्रा चांगलेच कनेक्ट असतात. त्याच्या मजेशीर पोस्टमुळे ते सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी Mahindra Jeep बाबत एक अतिशय मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे.
Mahindra Jeep ची किंमत १२,४२१ रुपये!
आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा जीपची किंमत कमी करणारे पोस्टर शेअर केले असून, या पोस्टमध्ये जीपची नवीन किंमत १२,४२१ रुपये सांगण्यात आली आहे. पोस्टमध्ये शेअर केलेले पोस्टर १९६० मधील आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की, महिंद्रा अँड महिंद्रा आपले मॉडेल CJ3B Jeep च्या किमतीत २०० रुपयांची कपात करत आहे. आता या जीपची नवी किंमत १२,४२१ रुपये आहे, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. ही पोस्ट शेअर करताना महिंद्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, एक चांगला मित्र ज्याचे कुटुंब आमच्या वाहनांचे वाटप खूप दिवसांपासून करत आहे, त्यांनी त्यांच्या संग्रहातून ही (जाहिरात) काढली. ते चांगले जुने दिवस... जेव्हा किमती योग्य दिशेने जात असत, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, त्या काळात महिंद्रा अँड महिंद्रा भारतात परवाना घेऊन जीप विलीचे उत्पादन करत असे. सध्या जीप ब्रँड फियाट क्रायल्सर मोटर्सच्या मालकीचा आहे.