नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कार निर्मिती कंपन्यांना उत्पादन खर्चाच्या वाढीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आता अनेक कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यातच आता महिंद्रा अँड महिंद्रानेही आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे.
कंपनीने गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, या वाढीनंतर विविध मॉडेल्सची शोरूम किंमत 10,000 रुपयांवरून 63,000 रुपयांपर्यंत वाढेल. स्टील, अॅल्युमिनिअमसारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की, कंपनी वस्तूंच्या किमतीतील वाढीचा बहुतांश भार उचलण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्याचा ग्राहकांवर केवळ अंशतः परिणाम होईल. दरम्यान, थार आणि XUV700 सारख्या मॉडेल्सची विक्री करणारी महिंद्रा अँड महिंद्रा ग्राहकांना नवीन किमतींबद्दल योग्य माहिती देण्यासाठी आपल्या विक्री आणि डीलर नेटवर्कसह काम करत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) देखील इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे त्याच्या संपूर्ण मॉडेल रेंजच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली. मात्र, कंपनीने अद्याप किंमती वाढण्याचे प्रमाण उघड केलेले नाही. एमएसआयने नियामक फाइलिंगमध्ये नमूद केले होते की, गेल्या एका वर्षात विविध इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.