नवी दिल्ली-
भारतात एसयूव्ही मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra) आता इलेक्ट्रीक एसयूव्ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या योजनेअंतर्गत आपली दमदार एन्ट्री करण्याच्या उद्देशातून कंपनी लवकरच आपली पहिली वहिली इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे. महिंद्रा एक्सयूव्ही ३०० इलेक्ट्रिक ही एसयूव्ही पूर्णपणे इलेक्ट्रीक कार असणार आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक एक्सयूव्ही ३०० (Mahindra XUV 300 Electric) पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत लॉन्च होणार आहे. याचा अर्थ असा की एक्सयूव्ही ३०० चं इलेक्ट्रीक व्हर्जन मार्च २०२३ पर्यंत भारतीय बाजारात दाखल होईल. विशेष म्हणजे यंदा १५ ऑगस्ट रोजी कंपनी ब्रिटनमध्ये इलेक्ट्रीकल व्हिकल बिजनेस स्ट्रॅटजी 'बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन'चा खुलासा करणार आहे.
४ मीटरहून अधिक मोठी असणार इलेक्ट्रिक XUV 300महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे एग्जिक्युटिव्ह डायरेक्टर राजेश जेजुरिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एक्सयूव्ही ३०० चं इलेक्ट्रीक व्हर्जन कंपनी लॉन्च करणार आहे आणि ही कार बाजारात पुढल्या वर्षीच्या पहिला तिमाहीत लॉन्च होईल. एक्सयूव्ही ३०० कारचंच इलेक्ट्रिक व्हर्जन जरी नवी कार असली तरी ती ४ मीटरपेक्षा मोठी असणार आहे. इलेक्ट्रीक कारची लांबी ४.२ मीटर इतकी असेल, असं जेजुरिकर यांनी सांगितलं आहे.
फॉक्सवॅगनसोबत महिंद्राचा करारइलेक्ट्रिक कार बाजारपेठेत जम बसवण्यासाठी महिंद्रा कंपनीनं नुकताच फॉक्सवॅगन कंपनीसोबत मोठा करार केला आहे. फॉक्सवॅगनच्या मॉड्युलर इलेक्ट्रीक ड्राइव्ह मॅट्रिक्स कम्पोनेंट्सचा वापर करण्यासंदर्भातील हा करार करण्यात आला आहे. सध्या कंपनी या कम्पोनेंट्सला पर्याय शोधण्यासाठीही मोठी मेहनत घेत आहे. एमईबी इलेक्ट्रीक प्लॅटफॉर्म आणि त्याचे कम्पोनेंट्स कार कंपन्यांना लवकर तसंच कमीत कमी खर्चात इलेक्ट्रिक पोर्टफोलियो तयार करण्यासाठी मदत देणारे ठरतात.