मुंबई: महिंद्राने नुकतीच लाँच केलेली MPV कार मराझोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार मिळाले असून ती भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार बनली आहे. या यशामुळे भारतीय कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करू लागल्याचे दिसत आहे. नुकतीच टाटाच्या नेक्सॉन या कारला 5 स्टार मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून टाटा नेक्सॉनला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतातील ग्राहकांची मानसिकता सुरक्षेपेक्षा मायलेज किती देते याकडे असल्याने मारुती सुझुकीसह काही कंपन्या सुरक्षेकडे लक्ष पुरवत नव्हते. मात्र, लोकांमध्ये जागृती होऊ लागल्याने आणि भारतासाठी 2014 पासून ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्ट सुरु केल्याने कंपन्याही आता हळूहळू सुरक्षेकडे लक्ष देऊ लागल्या आहेत. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता हे एक चांगले पाऊल आहे.
महिंद्राने गेल्या महिन्यातच मराझो ही कार लाँच केली होती. या कारमध्ये एबीएस, ड्युअल एअरबॅगसह ड्रायव्हर आणि पुढील प्रवाशासाठी सीटबेल्ट रिमायंडर स्टँडर्ड देण्यात आले आहे. या कारमध्ये ग्रील, टेललाईट आणि शार्कफिन अँटेना यामधून शॉर्क माशाची प्रतिकृती यामध्ये पाहायला मिळते. कारमध्ये प्रोजेक्टर लेंस हेडलँप्स, एलईडी फॉगलँप, एलईडी डीआरएल, डायमंड कट अलॉय व्हील्स सारखे फिचर देण्यात आले आहेत.
महिंद्राने या कारला चार व्हेरिअंट्समध्ये लाँच केले असून M2, M4, M6, M8 आणि 6 रंगात कार उपलब्ध केली आहे. कारमध्ये 7 इंचाची इन्फोटेन्मेंट सिसि्टम देण्यात आली आहे. याशिवाय व्हॉईस कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल फिचरही देण्यात आले आहे.