पर्यावरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने एकीकडे विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली असताना एक वाईट बातमी य़ेत आहे. भारतीय कंपनी महिंद्राने देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार e2o प्लसचे उत्पादनच थांबविले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'बुलडोझर'ला मोठा धक्का बसला आहे.
केंद्र सरकारने 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नंतर केवळ इलेक्ट्रीक वाहनेच विकली जाणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याचे 'बुलडोझर'चे वक्तव्य त्यावेळी चर्चेत होते. या नंतर वाहन निर्मिती कंपन्यांनीसुद्धा त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फोक्सवॅगन आणि आता मारुतीने डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
महिंद्राने या छोट्याशा दोन दरवाजांच्या e2o या कारचे उत्पादन 2013 मध्ये सुरु केले होते. तर ऑक्टोबर 2016 मध्ये या कारला चार दरवाजे देण्यात आले होते आणि e2o प्लस असे नाव दिले होते. या कारचे उत्पादन 31 मार्चपासून झालेले नाही.
महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. या कारचे पी8 हे व्हेरिअंट एका चार्जिंगमध्ये 140 किमी जात होते. तर अन्य व्हेरिअंट 110 किमी धावत होते. कंपनीने गेल्यावर्षीच P2 आणि P8 व्हेरिअंट बंद केले होते. आता त्यांच्याकडे केवळ दोनच मॉडेल आहेत.
फुल चार्जसाठी दीड तास लागायचा e2o च्या P2 व्हेरिअंटमध्ये 3kW सिंगल फेज 16 अँपिअरचा चार्जर येत होता. ही कार चार्ज होण्यासाठी 7.20 तास लागत होते. तर 32 अँपिअरच्या चार्जरद्वारे 1.35 तासांत फुल चार्ज होत होती. या कारमध्ये लिथिअम आयनची बॅटरी वापरली होती. या कारवर तीन वर्षांची किंवा 60 हजार किमीची वॉरंटी दिली जात होती. ही कार बंद झालेली असली तरीही त्याच्याजागी e-KUV100 ही नवीन इलेक्ट्रीक कार आणली जाण्याची शक्यता आहे. ही कार दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केली जाईल. तसेच XUV300 चीही इलेक्ट्रीक कार येण्याची शक्यता आहे. या कारमध्ये दोन बॅटरी दिल्या जातील.