देशात वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँन्ड महिंद्रानं मागील वर्षी देशात नवीन XUV 700 कारचं लॉन्चिंग केले होते. ही कार बाजारात येऊन जास्त काळ उलटला नाही मात्र कमी कालावधीत ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आज वाहन बाजारात महिंद्राची XUV कार लोकप्रिय आहे. XUV 700 कार ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवणारी पहिली एसयूवी वाहन आहे. ही कार वेळोवेळी तिच्या सुरक्षिततेबाबत कसोटीवर खरी उतरली आहे.
अलीकडेच XUV 700 कारच्या रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून तिच्या सेफ्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तामिळनाडूमधील आहे. ज्याठिकाणी एका Mahindra XUV 700 कारनं हायवेवर राज्य परिवहन सेवेच्या बसला टक्कर दिली. ही दुर्घटना जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यात पाहता येते की, बस समोरून येत असताना डावीकडून येणाऱ्या वेगवान XUV 700 कारनं बसला भीषण धडक दिली. ही टक्कर इतकी जोरात होती ज्यामुळे XUV च्या पुढील बाजूस नुकसान पोहचले.
हायवे-वर वाहन चालवताना सतर्क राहा
या अपघातात महिंद्रा XUV700 चा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र, अपघाताचा गंभीर परिणाम होऊनही XUV700 मधील प्रवासी सुरक्षित राहिले. मात्र अद्याप बस चालकाने समोरून येणारी XUV700 पाहिली की नाही हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, XUV700 चा वेग खूपच वेगवान होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येते. या अपघाताचा एका ट्विटर यूजरने व्हिडीओ पोस्ट केला करत आनंद महिंद्रांना टॅग केले.
त्यावर आनंद महिंद्रा(Anand Mahindra) म्हणाले की, या दुर्घटनेतील प्रवाशांना कुठलीही इजा पोहचली नाही त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आमच्या सर्व वाहनांमध्ये सुरक्षा हे प्रमुख उद्दिष्ट असते. मी आमच्या टीमचा आभारी आहे, ज्यांनी बनवलेल्या डिझाईनमुळे हे शक्य झाले. यातून आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल असं त्यांनी सांगितले. हा अपघात हायवेवर सुरक्षितपणे गाडी चालवणं किती महत्त्वाचं आहे, हे शिकवतो, ड्रायव्हरनं नेहमी डोळे आणि मन दक्ष ठेवणं गरजेचं आहे.