नाशिक : काहीशा बॉक्सी कार लाँच करणाऱ्या महिंद्राने इनोव्हा, अर्टिगा यांना टक्कर देणारी मराझ्झो ही बहुउद्देशिय कार लाँच केली आहे. या कारची किंमत 9.9 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. या कारमध्ये चार व्हेरिअंट्स असून सर्वात वरचे मॉडेलची किंमत 13.90 लाख रुपये आहे.
बहुउद्देशिय पॅसेंजर गाड्यांसाठी ओळखल्या जाणारी भारतीय कंपनी महिंद्रा गेल्या काही काळापासून मागे पडत चालली होती. काहीशा बॉक्सी टाईप कार ग्राहकांच्या मनात भरत नव्हत्या. बोलेरो, स्कॉर्पिओ, एक्सयुव्ही 500, टीयुव्ही 300 सारख्या गाड्या इतर कंपन्यांच्या टोयोटा इनोव्हा, टाटा हेक्सा, मारुतीची अर्टिगाच्या तुलनेत मागे पडत होत्या. तसेच डिझेलच्या इंजिनना मागणी घटली होती. यामुळे महिंद्राला एका नव्या फ्रेश लूक असलेल्या कारची गरज होती.
महिंद्राने आज लाँच केलेल्या मराझ्झो कारचे मायलेज 17.6 किमी प्रतिलिटर आहे. या कारच्या डिझाईन आणि विकसित करण्यासाठी कंपनीने 200 दशलक्ष डॉलर एवढी भलीमोठी रक्कम खर्च केली आहे.
मराझ्झोमध्ये 1.5 लिटर डिझेल चार सिलिंडर इंजिनची ताकद देण्यात आली आहे. हे इंजिन 121 बीएचपी टॉर्क प्रदान करते. सध्या हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये येणार आहे. अॅटोमॅटीकची अद्याप कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही. महिंद्रा या कारसाठी पेट्रोल आणि अॅटोमॅटीक इंजिनवर काम करत आहे. कदाचित हे इंजिन बीएस 6 प्रणाली लागू होईल तेव्हाच दिली जातील.