ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीत सारेकाही आलबेल नाहीय याचे संकेत मिळू लागले आहेत. फोक्सवॅगन या सर्वात मोठ्या कंपनीने भारतात 2 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही यश आलेले नसताना मूळ देश जर्मनीतून खळबळजनक वृत्त येत आहे.
मुळची जर्मनीची कंपनी असलेली फोक्सवॅगन मेटाकुटीला आली आहे. यामुळे आपल्याच देशातील प्रकल्प बंद करण्याची वेळ कंपनीवर आली असून कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनी जर्मनीतील प्रकल्प बंद करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीचे सीईओ ऑलिव्हर ब्लुमे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर कंपनीने १९९४ पासून कर्मचाऱ्यांना नोकरीची दिलेली हमी (जॉब सिक्युरिटी प्रोग्राम) संपुष्टात आणत असल्याचे जाहीर केले. कंपनीच्या आर्थिक सुधारणेसाठी सेवानिवृत्तीच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करणेच पुरेसे नसल्याचे कंपनीच्या मंडळाने म्हटले आहे.
युरोपियन ऑटोमोबाईल उद्योग सध्या एक आव्हानात्मक आणि गंभीर स्थितीत आहे. आर्थिक वातावरण बिघडले आहे आणि नवीन स्पर्धक युरोपकडे आकर्षित होत आहेत. यात जर्मनी एक स्पर्धात्मक स्थान म्हणून मागे पडत आहे. यामुळे एक कंपनी म्हणून आम्हाला काम करावे लागेल, असे ब्लुमे यांनी स्पष्ट केले.
मुळ कंपनी तिचे ब्रँड स्कोडा, सीट आणि ऑडी या उपकंपन्यांच्याही मागे पडली आहे. 2023 मध्ये जाहीर केलेल्या कपातीच्या धोरणानुसार 2026 पर्यंत १० अब्ज युरोची बचत होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी धडपड करत आहे. यासाठी खर्च सुनियोजित करण्याचा प्रयत्न करत आहे.
जर्मनीतील आर्थिक घडामोडींचे वृत्तपत्र हँडल्सब्लाटने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीला आणखी ४ अब्ज युरो वाचवावे लागणार आहेत. फोक्सवॅगनमध्ये सुमारे 680,000 कर्मचारी आहेत. २०२९ पर्यंत मोठी कपात केली जाणार आहे. वुल्फ्सबर्ग, हॅनोवर, ब्रॉनश्वीग, साल्झगिटर, कॅसल आणि एम्डेन येथे कंपनीचे प्लांट आहेत. यापैकी काही प्लँट बंद करण्यावरही कंपनी विचार करत आहे.