भारतीयांमध्ये कल्पकता आणि कौशल्य एवढे ठासून भरलेले आहे की त्याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. अशाच एका जुगाडू तरुणाने थेट उद्योगपती आनंद महिंद्रांना ट्विट करत नोकरी मागितली होती. त्याचा जुगाड पाहून आनंद महिंद्रांना रहावले नाही. त्यांनी का नाही देणार असे म्हणत आपल्या अधिकाऱ्यांनाच आदेश दिले आहेत.
एकीकडे टाटा, महिंद्रा, ह्युंदाई, एमजीसारख्या कंपन्या ईलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये आपला शिक्का जमविण्यासाठी धडपडत असताना एका तरुणाने जीपच इलेक्ट्रीक करून दाखविली आहे. महत्वाचे म्हणजे त्याने टाकाऊ वस्तू वापरून ही जीप इलेक्ट्रीकवर केली आहे. यानंतर त्याने थेट महिंद्रा यांना टॅग करत नोकरी द्या असे सांगितले. यावर महिंद्रा यांनी व्हिडीओ पाहून त्या 'महाभागा'ला शोधून आणण्याचे आदेशच आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो तामिळनाडूच्या एका तरुणाने तयार केला आहे. त्याच्याकडे एक अशी जीप आहे, जिला पेट्रोल किंवा डिझेलची गरज नाही. तर बॅटरीवर ती चालते. ए.के. गौतम (ए. गौतम) याने ही जीप तयार केली आहे. मेहनतीने बनवलेल्या या जीपचा व्हिडिओ शेअर करताना गौतमने आनंद महिंद्रा यांना नोकरी देण्याची विनंतीही केली. हा व्हिडिओ 17 ऑगस्टला ट्विट करण्यात आला होता, ज्यावर आनंद महिंद्रा यांनी शनिवारी उत्तर देताना गौतमचे कौतुक केले आहे.
बॅटरीवर चालणाऱ्या या जीपमध्ये दोन चाकांवर स्वतंत्रपणे कसे नियंत्रण केले जात आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासोबतच गौतमने बनवलेल्या या इलेक्ट्रिक जीपमध्ये मित्रांसोबत रस्त्यावर धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून महिंद्रा यांनी आपला अधिकारी आर वेलुस्वामी यांना तातडीने याला शोधा, असे आदेश दिले आहेत.