देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी म्हणजे मारुती. तिने बाजारात कोणती नवीन कार आणली की पाण्यासारखी त्या कारची विक्री होते. ग्राहकांच्या उड्या पडतात मग त्या कारचा शेप कसाही असो, कशीही दिसो 'लाथ मारेल तिथून पाणी काढेन' ही म्हण या कंपनीला चपखल बसते. परंतु मारुतीच्या जिम्नी कारला कोणी विचारेनासे झाले आहे.
महिंद्राच्या थारला आताही वर्ष-दीड वर्षाचे वेटिंग आहे. ही थारची क्रेझ कॅश करण्यासाठी मारुतीने जिम्नी बाजारात आणली. तिची किंमतही थारपेक्षा जरा चढच ठेवली. परंतु झाले असे की थार जेवढ्या हजाराच्या संख्येने विकली जाते ना त्याच्या शेकड्याचा आकडाही जिम्नीला गाठताना धाप लागू लागली आहे. थारचा रुबाब, पिकअप, बिल्ड क्वालिटी दर दूरच राहिली.
मारुतीने मार्च महिन्यात केवळ ३१८ जिम्नी विकल्या आहेत. देशातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या १० कारमध्ये सहा कार या मारुतीच्याच आहेत. एवढी बलाढ्य कंपनी असूनही थारने जिम्नीची जादू काही चालू दिलेली नाहीय. तर याच महिन्यात महिंद्राने ६०४९ थार विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात ५००८ एवढ्या थार विकल्या गेल्या होत्या.
जिम्नीची ही अवस्था काही मार्चपुरतीच नाहीय तर फेब्रुवारीतही मारुतीने ३२२ जिम्नी विकल्या. जानेवारीत तर त्यापेक्षा जास्त बेकार हालत झाली होती. या महिन्यात कंपनीने जिम्नीचे दीड लाखांचा डिस्काऊंट देऊनही १६३ युनिट विकले आहेत.