मारुतीने प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोरदार धक्का दिला आहे. टाटा, ह्युंदाईसारख्या कंपन्यांना चकीत करत मारुतीने ऑटोमॅटिककारच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. यामुळे मारुतीच्या कार घेणाऱ्या ग्राहकांची चांदी होणार आहे.
शहरात कार चालविण्यासाठी, महिलांसाठी ऑटोमॅटिक कार या सोईच्या ठरतात. गेल्या काही काळापासून या प्रकारच्या कारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: शहरामध्ये या कारची मागणी होत आहे. यामुळे मारुतीने प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यासाठी बेस्ट सेलिंग हॅचबॅक कारच्या किंमतीत ५००० रुपयां पर्यंतची कपात केली आहे. यामध्ये मारुतीची सेलेरिओ, वॅगनआर, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, फ्राँक्स या ऑटोमॅटिक कारचा समावेश आहे. मारुतीने आधीच अल्टो आणि एस प्रेसोसारख्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. यानंतरचा हा मारुतीने दिलेला दुसरा धक्का आहे. ही किंमत कपात १ जून पासून लागू करण्यात आली आहे.
टाटा, ह्युंदाईने जोरदार मुसंडी मारल्याने मारुतीच्या कारच्या विक्रीत घट झाली होती. छोट्या कारऐवजी लोकांमध्ये एसयुव्हीची क्रेझ वाढू लागली आहे. यामुळे मारुतीला फटका बसू लागला आहे. यामुळे लोकांना आपल्याकडे वळविण्यासाठी मारुतीने किंमतीत कपात करण्याची खेळी खेळली आहे.
गेल्या काही काळापासून मारुतीच नाही तर टाटा, ह्युंदाईच्या किंमती वाढतच चालल्या होत्या. खर्च वाढल्याचे सांगून ऑटो कंपन्या ही वाढ करत होत्या. परंतु आता मागणी घटल्याचे पाहून मारुतीने पहिल्यांदाच एवढी मोठी कपात केली आहे.