मारुती सुझुकीच्या ताफ्यात सध्या एकही इलेक्ट्रिक कार नाही. मात्र आता मारुती सुझुकीने आपल्या फ्यूचर प्लॅनसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. कंपनीने आगामी काळात काही इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. मारुती सुझुकीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
भार्गव म्हणाले, मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 2030 पर्यंत 10 नव्या कार येतील. विशेष म्हणजे यात 6 कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील. अर्थात इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासंदर्भात कंपनीने जोरदार तयारी सुरू केली आहे. याशिवाय कंपनीने आपले उत्पादन वाढविण्यावरही जोर दिला आहे.
मारुति 3.0 प्लॅन -मारुतीने प्लॅन 3.0 वर कामाला सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. या प्लॅनअंतर्गत कंपनी मोठ्या कार तयार करण्यासंदर्भात लक्ष आपले कक्ष केंद्रित करेल. गेल्या काही वर्षांत मारुतीच्या मोठ्या कारची विक्री वाढली आहे. तसेच, छोटी कारच्या (हॅचबॅक) विक्रीत घसरण दिसून आली आहे.
मारुतीच्या बहुतांश कार या हॅचबॅक सेगमेंटमध्ये येतात. यामुळे, ग्राहकांच्या मागणीनुसार, कंपनी मॉडेल्स बाजारात उतरवण्याच्या आपल्या रणनितीत बदल करू शकते. महत्वाचे म्हणजे, केवळ मारुतीच नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीमध्येच छोट्या कारच्या मागणीत घसरण झाल्याचे दिसत आहे. तसेच कॉम्पॅक्ट आणि सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारची मागणी वाढली आहे.