ऑल्टोला मागे टाकत मारुती सुझुकी बलेनो देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. गेल्या फेब्रुवारी 2023 मध्ये कार बिक्रीच्या बाबतीत बरेच फेरबदल बघायला मिळाले. यांपैकीच हाही एक आहे. टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशातील बेस्ट सेलिंग एसयूव्ही होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात एका एसयूव्हीने बाजी पलटली आहे. या एसयूव्हीचं नाव आहे मारुती ब्रेझा.
मारुती ब्रेझा फेब्रुवारी महिन्यात देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही ठरली आहे. ब्रेझाने नेक्सॉनला मागे टाकले आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ब्रेझाच्या 15,787 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षात फेब्रुवारी 2022 मध्ये हिचे केवळ 9,256 युनिट्स विकले गेले होते. अशा प्रकारे हिच्या विक्रीत 71 टक्के वार्षीक वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी अपडेट झाल्यानंतर हिच्या विक्रीत जबरदस्त वाढ दिसून आली आहे.
टाटा नेक्सॉनचा विचार करता, यावेळी ही कार दुसऱ्या क्रमाकावर आहे. फेब्रुवारी महिन्यात नेक्सॉनच्या 13,914 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 12,259 नेक्सॉनची विक्री झाली आहे. अशा प्रकारे या एसयूव्हीच्या विक्रीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशातील बेस्ट सेलिंग मिड साईज एसयूव्ही आहे. फेब्रुवारी महिन्यात हिच्या 10,421 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये क्रेटाच्या 9,606 युनिट्सची विक्री झाली होती. अर्थात क्रेटाच्या विक्रीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.