देशातील सर्वात मोठी कार कंपनी कोणती तर तुमचे उत्तर असेल मारुती सुझुकी. परंतू देशातील सर्वात मोठी ईलेक्ट्रीक कार कंपनी कोणती असे विचारले तर तुम्ही कोणाचे नाव घ्याल. मारुतीने आजवर एकही ईव्ही कार भारतीय बाजारात आणलेली नाही किंवा तसा प्रयत्नही केलेला नाही. उलट त्यांनी डिझेल कार बंद करून त्या कार पेट्रोल आणि सीएनजीमध्ये आणण्यास सुरुवात केली. आता सीएनजीदेखील आवाक्याबाहेर जाऊ लागल्यावर मारुतीला ईव्ही कारची आठवण येऊ लागली आहे.
सध्या टाटाने ईव्ही मार्केट बऱ्यापैकी ताब्यात घेतले आहे. मारुतीला सीएनजी मार्केट आपलेसे वाटू लागलेले असताना टाटाने दोन कार बाजारात आणल्या आहेत. अल्ट्रूझ, पंच देखील आता इलेक्ट्रीकमध्ये आणण्यात येणार आहे. असे असताना आता मारुतीला ऑटो इंडस्ट्रीचे भविष्य असलेल्या ईव्ही बाजारावर कब्जा करायचा आहे. यामुळे मारुती ईव्ही सेगमेंटमध्ये भारतात अनेक ईव्ही कार लाँच करण्याचा प्लॅन करत आहे.
मारुतीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाशी टेकुची यांनी तसे संकेत दिले आहेत. भारतीय बाजारपेठेत EV मॉडेल्स सादर करण्यात आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप मागे आहोत, परंतु EV ची बाजारातील मागणी अजूनही मर्यादित आहे. असे असले तरी आम्ही ईव्हीबद्दल काहीही करत नाही आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्याकडे असलेल्या कारमध्ये बॅटरी आणि ईव्ही मोटर लावून आम्ही चाचण्या सुरु केल्या आहेत. आम्ही या चाचण्या गेल्या वर्षभरापासून करत आहोत. भारतीय वातावरणात कठीण असलेले ईव्ही तंत्रज्ञान आम्ही सुसंगत बनविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
2030 पर्यंत खाजगी कारसाठी ईव्हीची विक्री 30 टक्क्यांनी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावर टेकुची म्हणाले की, ते शक्य नाहीय फारतर १० टक्के वाढेल. आम्हाला भारतीय ईव्ही ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील नंबर वन आणि लीडर व्हायचे आहे, २०२५ पर्यंत आम्ही पहिली ईव्ही आणू, असे ते म्हणाले.