मारुती सुझुकीने ऑल न्यू ग्रँड विटारा सादर केली आहे. ही ग्रँड विटारा मारुतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट आहे. कारण या कारने बी-सेगमेंटमध्ये आपला मार्केट शेअर वाढवावा, अशी कंपनीची इच्छा आहे. मात्र, यासाठी ग्रँड विटारा यशस्वी प्रोडक्ट म्हणून समोर येणे आवश्यक आहे. सध्या या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस सारख्या कार्सची जबरदस्त विक्री होताना दिसत आहे. यातच, कॉम्पिटिशन पाहता मारुती सुझुकीने ऑल न्यू ग्रँड विटारा बाजारात आणली आहे. कंपनी या कारला 'न्यू ब्रिड ऑफ एसयूवी' म्हणून संबोधत आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या बाबतीत हे एक नवे प्रोडक्ट आहे. मात्र, या प्रोडक्टला जे नाव देण्यात आले आहे ते जुनेच आहे. खरे तर जागतिक बाजारात विटारा पूर्वीपासूनच विकली जात आहे. एवढेच नाही, तर फार कमी लोकांना माहीत असेल, की यापूर्वीही एकदा मारुती सुझुकीने ग्रँड विटारा भारतीय बाजारात लाँच केली होती. तेव्हा ही कार भारतीय ग्राहकांना आकर्शित करण्यात अयशस्वी ठरली होती.
तेव्हा मारुती सुझुकीची ग्रँड विटारा ही भारतीय बाजारात जम बसवण्यात अयशस्वी ठरली होती. यामुळे, भारतामध्ये ती मारुतीच्या फ्लॉप उत्पादनांमध्ये गणली जाते. काही वर्षे भारतात विक्री केल्यानंतर मारुती सुझुकी ग्रँड विटारा भारतात बंद करण्यात आली होती. ही कार सुमारे 2009 ते 2015 पर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती. खरे तर ही कार केवळ 2.4 लिटर पेट्रोल इंजिन मध्येच उपलब्ध होती. या कारमध्ये डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध नव्हता. हेच ही कार फ्लॉप होण्याचे सर्वात मोठे कारण होते.
या कारची किंमतही खूप अधिक होती. शेवटी शेवटी तर हिची किंमत 23 लाख रुपयांपर्यंत गेली होती. ही किंमत मारुती सुझुकीच्या इतर कोणत्याही कारपेक्षा अधिक होती. परिणामी, त्यावेळी मारुती सुझुकी ग्रँड विटारा फ्लॉप ठरली होती. आता मारुती सुझुकीने ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रिड पर्यायासह सादर केला आहे, यात ती 27.97Kmpl मायलेज देऊ शकते.