Maruti Suzuki S-Cross: मारुती सुझुकी इंडियाने कंपनीच्या अधिकृत Nexa वेबसाइटवरून आपली S-Cross ही कार काढून टाकली आहे. या कारची विक्री कमी झाल्यानंतर कंपनीने वेबसाइटवरून डिलिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून या कारचे एकही युनिट विकले गेले नाही. मारुतीने 2015 मध्ये ही कार भारतीय बाजारात लाँच केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असेही वृत्त आहे की कंपनी ही कार कायमची बंद करण्याची शक्यताही आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी नेक्सा डीलरशिपच्या अधिकृत वेबसाइटवरून एस-क्रॉस डिलिस्ट झाल्यानंतर Grand Vitara, XL6, Ciaz, Baleno आणि Ignis याच कार आता दिसत आहेत. गेल्या काही काळापासून एस-क्रॉसची मागणी कमी होत आहे. गेल्या 3 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या कारचे एकही युनिट विकले गेले नाही.
मागणी कमीमारुती सुझुकी आपल्या गुडगाव येथील युनिटमधून एस-क्रॉसचं उत्पादन करत होती. 2022 मध्ये या कारच्या विक्रीत घट होऊ लागली. एप्रिलमध्ये कंपनीने 2,922 युनिट्सची विक्री केली होती, परंतु मेमध्ये हा आकडा 1,428 युनिट्सवर आला. जूनमध्ये या एसयूव्हीची विक्री केवळ 697 युनिट्स विकली गेली. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तिची विक्री शून्य होती म्हणजेच या कारचे एकही युनिट विकले गेले नाही.
डिस्काऊंटही कामी आला नाहीकारची मागणी कमी झाल्यानंतर पुन्हा सेल वाढवण्याच्या उद्देशाने कंपनीनं यावर मोठा डिस्काऊंटही दिला होता. कंपनी या कारवर 42 हजारांपर्यंत डिस्काऊंट देत होती. परंतु यानंतरही ग्राहकांनी एस क्रॉसकडे पाठ फिरवली. ही कार कंपनीच्या लक्झरी कार्समध्ये सामील आहे. फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर या मिड साईज एसयुव्हीमध्ये रेन सेन्सिंग व्हायपर्स, क्रुझ कंट्रोल, एलईडी प्रोजेक्टर हेडलँप, 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात येतो. या कारची किंमत 8.95 लाख रूपये ते 12.92 लाख रूपये एक्स शोरूम इतकी आहे.