देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने पहिली वहिली इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे. ही लाँच करून दोन-चार दिवस उलटत नाही तोच कंपनीने नवी कार घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा शॉकही दिला आहे. मारुतीच्या कारच्या किंमती येत्या १ फेब्रुवारीपासून वाढणार आहेत. वेगवेगळ्या कारच्या किंमतीत ३२ हजारपर्यंत वाढ केली जाणार आहे.
कार निर्माण करण्यासाठी वाढलेला खर्च आणि महाग होत चाललेला कामकाजाचा खर्च यामुळे कंपनीला कारच्या किंमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मारुतीने म्हटले आहे. ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून ही किंमत वाढ कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
मारुती ही देशातील मोठी कंपनी आहे. विक्रीमध्ये सुपरडुपर हिरो असली तरी फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगमध्ये मारुती झिरो होती. नुकत्याच मारुतीच्या डिझायर या कारने फाईव्ह स्टार रेटिंग मिळविली आहे. अन्य कारची सेफ्टी रेटिंग अगदी झिरो आहे. असे असले तरी मारुतीच्या कारना रिसेल व्हॅल्यू आणि कुठेही दुरुस्त करता येते, स्पेअर पार्ट मिळतात या कारणाने मोठी मागणी आहे. यामुळे मारुतीचा ग्राहकवर्ग देखील अधिक आहे.
मारुतीच्या सेलेरिओच्या किंमतीत सर्वात मोठी म्हणजेच ३२,५०० रुपयांची वाढ केली जाणार आहे. वॅगन आरच्या किंमतीत १५००० रुपयांची वाढ केली जाणार आहे. स्विफ्टच्या किंमतीत ५००० रुपये, ब्रेझा, ग्रँड विटाराच्या किंमतीत २०००० रुपये आणि अल्टो के १० च्या किंमतीत १९५०० रुपयांची वाढ केली जाणार आहे. बलेनोच्या किंमतीत ९००० रुपये आणि फ्राँक्सच्या किंमतीत ५५०० रुपयांची वाढ केली जाणार आहे.