नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीनंतर आता कारची सवारी सुद्धा तुमच्यासाठी महाग होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे.
खर्चात वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णयकंपनीने म्हटले आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे किमती वाढवून त्याचा काही भाग ग्राहकांवर लादणे गरजेचे झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस किंमती वाढवण्याची योजना आहे. किमतीतील वाढ वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल.
वर्षभरात चार वेळा वाढले भाव मारुती सुझुकीने गेल्या एका वर्षात चार वेळा आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कमोडिटीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या वाहनांच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
खर्चात वाढ झाल्यामुळे मार्जिनवर परिणामकोणत्याही कार निर्मात्यासाठी इनपुट खर्च खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी साहित्याचा खर्च हा एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के असतो, परंतु मारुती सुझुकीसाठी तो 80.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे कंपनीच्या मार्जिनवरही परिणाम झाला आहे. त्यामुळेच मारुती सुझुकीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले जात आहे.