जपानची ऑटो कंपनी, भारतात मारुतीसोबत भक्कम पाय रोवलेली सुझुकी मोटर्सने मोठा निर्णय घेतला आहे. सुटे भाग आणि अॅक्सेसरीजची टंचाई असल्याने सुझुकीने पाकिस्तानातील कंपनी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक फायलिंगवेळी कंपनीने ही माहिती दिली आहे.
सुझुकीने यासाठी पाकिस्तानी सरकारच्या स्टेट बँकेला जबाबदार धरले आहे. एसबीपीने मे २०२२ मध्ये एक सिस्टिम आणली होती. पूर्णपणे नॉक-डाउन (CKD) किट आयात करण्यासाठी पूर्व परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रणालीचा मालाच्या मंजुरीवर विपरित परिणाम झाला आहे, ज्यामुळे इन्व्हेंटरी कमी झाली आहे, असा आरोप कंपनीने केला आहे.
यामुळे पाक सुझुकी २२ जून ते ८ जुलैपर्यंत मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांची निर्मिती बंद ठेवणार आहे. यापूर्वी कंपनीने ऑगस्ट, २०२२ मध्ये ७५ दिवसांसाठी प्रकल्प बंद ठेवला होता. भारतात ज्या गाड्या मारुती विकते त्याच गाड्या रिबॅज करून सुझुकी पाकिस्तानात विकते. परंतू, भारतात महिन्याला जेवढ्या मारुती कार विकते तेवढ्या गेल्या वर्षीवर्यंत वर्षाला सुझुकी विकत होती. आता आर्थिक संकटामुळे हा आकडा ५४ टक्क्यांनी घसरला असून FY23 मध्ये 62,354 कार विकल्या गेल्या आहेत.
ऑटो फायनान्सिंगच्या कमतरतेमुळे पाकिस्तानमधील ऑटो उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मार्चमध्ये व्याजदर 7 टक्क्यांवरून आता 21 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील चारचाकी वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.