टोयोटाने प्रिमियम हॅचबॅक श्रेणीतील मारुतीची बलेनो कारची हुबेहुब कॉपी केली आहे. Toyota Glanza असे या कारचे नाव असून ही कार दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त कराराद्वारे विकसित करण्यात आली आहे. या कारचा टीजर कंपनीने नुकताच लाँच केला असून या कारचा पहिला फोटोही व्हायरल झाला आहे. ही कार पार्किंग करताना स्पॉट झाली.
बलेनोपेक्षा काही बदल या कारमध्ये करण्यात आले आहेत. पुढे नवीन ग्रील आणि थोडासा बदललेला शेप दिसून येतो. दोन क्रोम स्लेट्स असून मध्यभागी टोयोटाचा लोगो लावण्यात आला आहे. बाकी ही कार बलोनोसारखीच दिसते. या कारची बॉडी आणि सांगाडा हा बलेनोसारखा हर्टटेक्ट सारखा आहे की बदलेला आहे याबबात अद्याप माहिती समोर आलेली नाही.
पाठीमागील बाजुला ही कार बलेनोसारखीच आहे. मागील शेपमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कारचे व्हेरिअंट आणि ब्रँड बॅजिंगशिवाय कोणताही बदल झालेला नाही. बलेनोची विक्री महिन्याला 18 हजार कार एवढी आहे. यामुळे मारुतीने टोयोटाकडूनही तेवढ्याच कारविक्रीची अपेक्षा केलेली आहे. यावर टोयोटाने एवढी विक्री शक्य नसल्याचे म्हटले आहे. यामुळे या कारची विक्री किती होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असून पुढे फोर्ड आणि महिंद्रा मिळून अशा कार विकण्याची शक्यता आहे.
कारच्या अंतर्गत बदलांची शक्यता आहे. कारण ही कार ग्राहकांना टोयोटाची वाटण्यासाठी कंपनी काही बदल करेल. तसेच या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिन ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. एक मारुतीचे 1.2 लीटरचे फोर सिलेंडर के12 इंजिन किंवा टोयोटाचे 1.2 लीटर फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 79 बीएचपी ताकद आणि 104 एनएम टॉर्क उत्पन्न करेल.
Toyota आणि Suzuki या कंपन्यांनी सहकार्य़ करार केला आहे. यामध्ये तंत्रज्ञान विकास, वाहनांचे उत्पादन आणि विक्री यांचादेखिल समावेश आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये दोन्ही कंपन्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच भविष्यात वीजेवर चालणाऱ्या कार विकसित करण्यासाठीही तरतूद केली आहे.