मेरठ : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे बाइक आणि कार चालकांमध्ये नाराजी आहे. यातच आता इलेट्रिक वाहनांच्याकडे जास्त ग्राहकांचा कल दिसून येत आहे. यादरम्यान, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राहणाऱ्या दोन भावांनी अशी एक ई-बाइक बनवली आहे, जी सिंगल चार्जिंगमध्ये 150 किलोमीटर धावेल. तसेच, या बाइकला चार्ज करण्यासाठी फक्त 5 रुपये मोजावे लागतील. 16 वर्षीय अक्षय आणि 21 वर्षीय आशिष यांनी ही कामगिरी केली आहे.
अक्षय पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून आशिष एमएचे शिक्षण घेत आहे. दोघेही सख्खे भाऊ आहेत. अक्षयने ई-बाइक बनवण्याचे सर्व टेक्निकल काम पाहिले आहे, कारण तो पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत आहे आणि त्याला टेक्निकल गोष्टींचे सर्व ज्ञान आहे. ई-बाइक बनवण्यासाठी विविध ठिकाणांहून सुटे पार्ट एकत्र करण्यात आले. काही नवीन आणि काही जुन्या वस्तू एकत्र करून ही ई-बाइक तयार करण्यात आली आहे.
या ई-बाइकचे नाव तेजस ठेवण्यात आले आहे. कारण जेव्हा ही बाईक आली तेव्हा लोक म्हणायचे, ती रॉकेट आणि मिसाईलसारखी दिसते, असे आशिषने सांगितले. याचबरोबर, जेव्हा वडिलांकडून बुलेट मोटरसायकल मागितली, तेव्हा वडिलांनी सांगितले की बुलेट कोण पाहते. यानंतर वाटले की अशी एखादी मोटरसायकल किंवा बाइक बनवावी, जी प्रत्येकाने पाहावी आणि त्यानंतर ही बाइक बनवण्याचा निर्णय घेतला आणि आज अशी बाइक बनवल्याचा आनंद आहे. तेजस चालवताना सर्वजण त्याबद्दल विचारतात आणि बघतात. ही ई-बाइक बनवण्यासाठी जवळपास 35 हजार रुपये खर्च आला आहे, असे आशिषने सांगितले.
बाइकच्या फिचर्सबद्दल सांगायचे झाले तर, या बाइकची बॅटरी अवघ्या 5 रुपयांमध्ये चार्ज होते. पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास 7 तास लागतात. तसेच, बॅटरी चार्ज करण्यासाठी सुमारे एक युनिट वीज वापरली जाते. 7 तासांच्या चार्जिंगनंतर ही बाइक 150 किमीचा प्रवास करू शकते. एवढेच नाही तर या बाइकला बॅक गियर देखील देण्यात आला आहे. बाइक तयार करण्यासाठी पीव्हीसीचा वापर करण्यात आला आहे. ई-बाइकमध्ये बॅटरी लावलेली आहे. बाइकमध्ये स्पीड वाढवण्यासाठी एक बटनही देण्यात आले आहे. तसेच, ई-बाइकचा कमाल वेग 60 ते 65 किमी प्रतितास आहे.